निगडी :- चेह-यांवरील हास्य आणि डोळ्यांमधील चमक आपल्या प्रसन्न व्यक्तिमत्वाची ओळख करून देतात. हसतमुख असण्याने आपले काही जात नाही. पण यातून अनेक गोष्टीचे मूल्यांकन केले जाऊ शकते. स्वच्छ परिधान आणि चांगले शारीरिक हावभाव हे यशाचे प्रतीक बनू शकते. शारीरिक हावभावात डोळ्याचे विशेष महत्व आहे. दोन व्यक्तींमधील संबंध त्यांचे डोळे अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करतात. दोन व्यक्ती एकमेकांशी संवाद साधताना त्यांच्या शारीरिक हावभावापेक्षा डोळ्याची भाषा अधिक बोलते. जो व्यक्ती दुसर्या व्यक्तीचे म्हणणे हावभावातून समजतो तोच जीवनात यशस्वी होतो, असे मत बिमिश स्कूलच्या संस्थापिका सोनिया गोवर्धन यांनी व्यक्त केले. जागतिक महिलादिनानिमित्त येथील आयसीएआय इन्स्टिटयूटच्या पिंपरी-चिंचवड शाखेमध्ये ‘बॉडी लँग्वेज अॅण्ड ग्रूमिंग’ याविषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्यावेळी आयसीएआय पिंपरी-चिंचवड शाखा अध्यक्ष आमोद भाटे, सचिव प्राजक्ता चिंचोळकर, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष युवराज तावरे, माजी अध्यक्ष रवींद्र नेर्लीकर, माजी अध्यक्ष सुहास गार्डी आदी उपस्थित होते.
जीवनशैलीचे परिणाम होतात
लाईफस्टाईल मोडिफिकेशन अॅण्ड आयुर्वेद यावर डॉ. प्राची म्हणाल्या, सामाजिक आणि आर्थिक स्थित्यंतराच्या लाटेमुळे गेल्या दहा वर्षांत सामान्य मनुष्याची जीवनशैलीच बदलली आहे. भौतिक सुखसुविधांची गरज वाढत आहे आणि ही गरज भागवण्यासाठी सर्वच माणसे धावत आहेत. ही धावपळ म्हणजे एकाच जागेवर तासन्तास बसून शरीराची आणि मनाची केलेली ओढाताण आहे. अशा या जीवनशैलीचे आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम होतात. यावेळी जागतिक महिलादिनानिमित्त इन्स्टिटयूटच्या विद्यार्थिंनी व सीए मेंबर्सने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमोद भाटे यांनी केले. सूत्रसंचालन वीणा पूजारी व प्रतिमा जुनोनीकर यांनी केले.