नवी दिल्ली : इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या (आयसीएसएसआर) अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत सावळागोंधळ झाल्याचे समोर आले आहे. अध्यक्ष निवडीसाठी बनवण्यात आलेल्या कॉलेजियममध्ये प्रतिष्ठीत व्यक्तिंची एक यादी तयार करण्यात आली होती. यातून एकाची अध्यक्षपदी निवड केली जाणार होती. पण जी यादी बनवण्यात आली होती. त्यातील 10 व्यक्तिंचा आधीच मृत्यू झाला होता. इतकंच नाही तर यातील सात जणांचा मृत्यू तर कॉलेजियम बनवण्यापूर्वीच झाला होता. आयसीएसएसआरच्या नियमानुसार समितीतील व्यक्तिंपैकीच काहींची निवड करावी लागते. यातील तीन नावे अंतिम करून ती सरकारकडे पाठवावी लागतात. त्या तीन नावांपैकी एका नावावर मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब केले जाते.
2 मे रोजी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने बृजबिहारी कुमार यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित केले. 76 वर्षीय कुमार यांनी त्रैमासिक पत्रिका वार्ता आणि चिंतन श्रीजानचे संपादक म्हणून काम पाहिलेले आहे. आता ते तीन वर्ष आयसीएसएसआरच्या अध्यक्षपदी राहतील. कुमार यांची याच प्रक्रियेतून निवड करण्यात आली आहे. आतापर्यंत या पदावर सुखदेव थोरात होते. मात्र गेल्या महिन्यातच ते निवृत्त झाले आहेत. दरम्यान या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी एकूण 244 नावांची यादी तयार करण्यात आली होती. यापैकी एकाची निवड होणार होती. थोरात अध्यक्ष असतानाच ही यादी तयार करण्यात आली होती.
ही नावे शंकास्पद
इंडियन कौन्सिल ऑफ हिस्ट्रॉरिकल रिसर्च (आयसीएचआर) निहार रंजन राय (मृत्यू 1981), बी. आर. ग्रोवर (मृत्यू 2001), के. एस. लाल (मृत्यू 2002), आर. कुलकर्णी (मृत्यू 2009), आर. एस. शर्मा (मृत्यू 2011), रविंदर कुमार (मृत्यू 2001) यांची नावे कॉलेजियममध्ये समाविष्ट करण्यात आली होती. त्याचबरोबर भूगोल तज्ज्ञ एल. एस. भट्ट यांचेही नाव कॉलेजियममध्ये होते. त्यांचा मृत्यू 2013 मध्ये झाला आहे. त्याचबरोबर इतिहासकार बिमल प्रसाद आणि आयसीएसएसआरच्या माजी प्रमुख रजनी कोठारी यांचे नावही या यादीत होते. परंतू या दोघांचाही मृत्यू 2015 मध्ये झाला आहे. तसेच यादीतील जावेद आलम यांचा मृत्यू गेल्या वर्षी झाला आहे.