आयसीसीवर ‘मनोहर’ राजच!

0

दुबई । मार्च महिन्यात अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याची इच्छा दर्शवलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. आपण आपली अध्यक्षपदाची टर्म पूर्ण करु, असे त्यांनी म्हटले आहे. यानुसार, मनोहर आता पुढील वर्षी जून महिन्यापर्यंत अध्यक्षपदी कार्यरत राहतील, हे स्पष्ट झाले आहे. यामुळे शशांक मनोहर यांच्या कार्यकाळाबाबत असलेली अनिश्चितता संपली आहे. आणखी एक वर्ष त्यांच्याकडेच हे पद राहणार असल्याचे आयसीसीकडून सांगण्यात आले. जून 2018मध्ये आयसीसीचे नवीन अध्यक्ष निवडले जाणार असून तोपर्यंत त्यांच्याकडेच कार्याध्यक्षपदाची सूत्रे राहतील, अशी माहिती आयसीसीने एका पत्रकाद्वारे दिली आहे.

सदस्यांच्या विनंतीला दिला मान
मार्च महिन्यात वैयक्तिक कारणांचा हवाला देत आयसीसी अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला. पण, आयसीसी कार्यकारिणीने त्यांना जूनमधील वार्षिक सभेपर्यंत अध्यक्षपद सांभाळण्याची विनंती केल्यानंतर मनोहर यांनीही ती मान्य केली होती. मनोहर यांनी बिग थ्री फॉर्म्युल्याला कडाडून विरोध केल्यानंतर त्याचे विशेषतः बीसीसीआयमध्ये तीव्र पडसाद उमटले होते. बिग थ्री धोरणानुसार, क्रिकेटच्या अर्थ व व्यवस्थापनावर भारत, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांची प्रामुख्याने सत्ता राहणार होती. पण, मनोहर यांनी अध्यक्षपदी रुजू झाल्यानंतर हा फॉर्म्युला आपल्याला पसंत नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. मनोहर यांनी गेल्या मार्चमध्ये वैयक्तिक कारणास्तव या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आयसीसीच्या सर्व सदस्यांनी मनोहर यांना राजीनामा न देण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत मनोहर यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला होता.

पुढील महिन्यात आयसीसीची वार्षिक सर्वसाधारण सभा पुढील महिन्यात आयसीसीची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. ही सभा झाल्यानंतर कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा ते विचार करीत होते, मात्र पुन्हा सदस्यांनी त्यांना राजीनामा देऊ नये अशी विनंती केली. प्रशासकीय आराखडयात आमूलाग्र सुधारणा करण्याबाबत मनोहर यांनी काही योजना आखल्या होत्या. त्यांची अंमलबजावणी होईपर्यंत त्यांनी कार्याध्यक्षपद सोडू नये असेच सर्व सदस्यांचे मत आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कराराचे नूतनीकरण!
चॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या कराराचे नूतनीकरण करण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाणार आहे. कुंबळे यांची गतवर्षी वेस्ट इंडिज दौर्‍याच्या वेळी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. जूनअखेरीस त्यांच्याबरोबर केलेला करार संपणार आहे. एका पदाधिकार्‍याने सांगितले की, कुंबळे यांच्याबरोबर केलेल्या कराराचे नूतनीकरण होण्याची दाट शक्यता आहे. मात्र चॅम्पियन्स स्पर्धेनंतर बीसीसीआयची सर्वसाधारण सभा होणार असून त्यामध्ये याबाबत अधिकृत निर्णय घेतला जाणार आहे. फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर व क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक आर. श्रीधर यांचीही चॅम्पियन्स स्पर्धेपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे.