आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत टीम इंडिया चौथ्या स्थानी

0

दुबई । टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय क्रमवारीत 112 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा संघ 119 गुणांसह अव्वल स्थानावर असून ऑस्ट्रेलिया (118) आणि न्यूझीलंड (113) हे अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही.

जानेवारी महिन्यात भारतीय संघाने अखेरचा एकदिवसीय सामना इंग्लंडविरुद्ध खेळला होता. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान या देशांचे विश्वचषकात थेट प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वेस्ट इंडिजने 1975 आणि 1979 साली विश्वचषक जिंकला होता. पण सध्याच्या घडीला 84 गुणांसह ते नवव्या स्थानावर आहेत. 1992 साली विश्वचषक पटकावलेला पाकिस्तानचा संघ या क्रमवारीत 89 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांच्या पुढे बांगलादेशचा संघ आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करत बांगलादेशने 92 गुणांसह सातवे स्थान पटकावले आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डी’व्हिलियर्स अव्वल स्थानावर विराजमान आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा तडाखेबंद सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दुसर्‍या आणि भारताचा कर्णधार विराट कोहली तिसर्‍या स्थानावर आहे. अष्टपैलूंच्या क्रमवारीत बांगलादेशचा शकिब अल हसन अव्वल स्थानावर आहे.