मुंबई : सध्या खराब फॉर्मशी झुंज देत असलेल्या शिखर धवनला एकदिवसीय संघात परतायची घाई झाली असून यासाठी त्याने तयारी देखील सुरु केली आहे. भारतीय संघातून वगळण्यात आलेला सलामीचा फलंदाज शिखर धवनने राष्ट्रीय संघातल्या पुनरागमनासाठी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. यंदा 1 ते 18 जून या कालावधीत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या निवडीला अजूनही तीन महिन्यांचा अवधी आहे, याकडे लक्ष वेधून धवन म्हणाला की, त्या अवधीत मला तीन-चार स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यात सर्वोत्तम कामगिरी बजावली, तर मला भारताच्या वन डे संघात पुनरागमनाची संधी मिळू शकते, असा विश्वासही धवनने व्यक्त केला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यांत शिखर धवन अपयशी ठरला होता. तिसऱ्या सामन्यापासून त्याला भारताच्या वन डे संघातून वगळण्यात आले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर तो कसोटी क्रिकेटही खेळलेला नाही.तसेच 2016 सालच्या मार्च महिन्यानंतर शिखर धवनला भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघातूनही वगळण्यात आले आहे.