आयात उमेदवारांच्या इंट्रीने भाजप-शिक्षक परिषदेत वाद

0

मुंबई :- शिक्षक परिषदेने महिन्याभरापूर्वी मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले असतानाच त्यांच्यावर कुरघोडी करत भाजपनेही याच मतदारसंघात दोन आयात केलेल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि भाजप यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. यामुळे राज्यात कुरघोडीच्या शिक्षक मतदारसंघात भाजप, संघ यांच्या कार्यकर्त्यांची मोठी पंचाईत होणार आहे.

मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात लवकरच निवडणुका होत आहेत त्यासाठी कालच भाजपने आयात केलेल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. मुंबई शिक्षक मतदार संघात भाजपशी कोणताही संबंध नसलेल्या कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या प्रा. अनिल देशमुख आणि नाशिक शिक्षक मतदार संघात अनिकेत विजय पाटील यांची पक्षातर्फे उमेदवार म्हणून नावे घोषित केले. अनिल देशमुख हे मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयात २७ वर्षापासून भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत, त्यांचा भाजपाशी संबंध नाही तर विजय नवल पाटील या माजी कॉंग्रेस खासदारांचे अनिकेत पाटील हे चिरंजीव आहेत. ते संजय एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत.

शिक्षक परिषदेने या पूर्वी मुंबईतून अनिल बोरनारे आणि नाशिकमधून सुनील पंडीत यांची नावे घोषित केली होती. त्यांचा प्रचारही संघाच्या परंपरेनुसार सुरू करण्यात आला होता. मात्र त्यांना विश्वासात न घेताच भाजपाच्या नेत्यानी या दोन्ही जागा आयात केलेल्या उमेदवारांच्या तावडीत कश्या दिल्या असा सवाल केला जात आहे.