आयुक्तपदाच्या निर्णयावरील चौकशीबाबत मुंडेंचे मौन!

0

पुणे : नवी मुंबई महापालिकेत आयुक्त असताना तुकाराम मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयाची चौकशी करण्याचा ठराव एकमताने पारित झाला असताना, या मुद्द्यावर काहीही बोलण्यास सद्या पुण्यात पीएमपीएमएलचे अध्यक्ष असलेल्या मुंडे यांनी स्पष्ट नकार दिला. तेथील मनपा सभागृहात सर्वच लोकप्रतिनिधींनी एकमताने चौकशीच्या ठरावाला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर तेथील महापौर सुधाकर सोनावणे यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. तसेच, पक्षीय बलानुसार 15 जणांच्या सदस्यांची तदर्थ समिती नेमण्याचे आदेश प्रशासनाला देत, निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशीची सूचना दिल्या आहेत. या विषयावर काहीही भाष्य करून वादाच्या भोवर्‍यात अडकण्याऐवजी मुंडे यांनी शांत बसणेच पसंत केले.

नवी मुंबई मनपातील लोकप्रतिनिधी मुंडेंविरुद्ध आक्रमक
नवी मुंबईत आयुक्त असताना महासभेच्या निर्णयांची पायमल्ली करणे, महासभेला विश्वासात न घेता अधिकार्‍यांना निलंबित करणे वा त्यांची नियुक्ती करणे, अधिकार्‍यांच्या विभागीय चौकशी सुरू करणे, यासोबतच उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या रिट पिटीशनवर झालेला खर्च असे अनेक ठपके तुकाराम मुंडे यांच्या कामकाजावर ठेवण्यात आले आहेत. मुंडेंनी घेतलेल्या निर्णयांमुळे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे मोठे नुकसान झाले आहे, असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकर यांनी केला होता. तसेच, नगरसेवक नामदेव भगत यांनी तर मुंडेंवर तोंडसुख घेत त्यांनी बढत्या दिलेले अधिकारी कूचकामी ठरल्याची टीका केली. मुंडेंनी ज्या अधिकार्‍यांवर कारवाई केल्या आहेत. त्या कारवाया आकसापोटी केल्या असून, त्यांची पुन्हा चौकशी करून अन्यायकारक कारवाईतून सुटका करावी, अशी मागणी भगत यांनी केली. त्यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे नगरसेवक संजू वाडे व राष्ट्रवादीच्या अपर्णा गवते यांनीही मुंडेंवर घणाघाती टीका केली होती. लोकप्रतिनिधींचा तीव्र आक्षेप पाहाता, महापालिकेने मुंडेंच्या निर्णयांची चौकशी करण्याचा ठराव बहुमताने पारित केलेला आहे. हा विषय एकीकडे राज्यात गाजत असताना, मुंडेंनी मात्र या विषयावर काहीही बोलणार नाही, अशी भूमिका घेतली होती. तसे, त्यांनी दैनिक जनशक्तिच्या प्रतिनिधीला स्पष्टपणे सांगितले.

मुंडेंसाठी पिंपरी भाजपातील एक गट सक्रीय
नवी मुंबईत वादग्रस्त ठरलेले तुकाराम मुंडे हे पीएमपीएमला अध्यक्ष द्यावेत, अशी मागणी पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार फडणवीस यांनी मुंडे यांना पुण्यात पाठवले आहे. परंतु, मुंडे हे पुण्यातदेखील वादग्रस्त ठरत आहेत. पीएमपीएमलच्या अध्यक्षपदावरून त्यांनी घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरत असून, पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिकेच्या स्थायी समितींचे अध्यक्ष त्यांच्याविरोधात गेलेले आहेत. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी त्यांची वर्णी लागावी, यासाठी पिंपरी भाजपमधील एक गटदेखील सक्रीय झाला असून, त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्रदेखील देण्यात आलेले आहे. तथापि, असा कोणताही निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेऊ नये, यासाठी पिंपरी-चिंचवडमधील दोन आमदारांनीही मुख्यमंत्र्यांना साकडे घालून ठेवलेले आहे.