पिंपरी : शहरात एकूण 1850 अधिकृत होर्डिंग्ज आहेत. तर, 325 अनधिकृत होर्डिग्ज असून आकाशचिन्ह व परवाना विभागाने या होर्डिग्ज धारकांना नोटीस बजाविल्या आहेत. तर, आतापर्यंत 22 जणांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात होर्डिंग काढताना कोणतीही खबरदारी न घेतल्याने होर्डिंग्जचा सांगाडा कोसळल्याने चारजणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात देखील प्रत्येक चौकात फ्लेक्स व होर्डिंग्ज उभारलेले आहेत. यामध्ये काही अनधिकृत होर्डींग्जचादेखील समावेश आहे. शहर स्मार्ट सिटीकडे प्रवास करीत असताना होर्डिंग्जमुळे बकालपणा तयार होत आहे. या सर्व मोठ्या होर्डिंग्जची तपासणी करण्याची मागणी नगरसेवक शैलेश मोरे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये अशा कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून आपण लवकरात लवकर पिंपरी-चिंचवड अंतर्गत असणारे सर्व होर्डिंग तपासण्याचे आदेश द्यावे अशी निवेदनाद्वारे मागणी केलीआहे.