पिंपरी-चिंचवड : माहितीच्या अधिकारात नागरिकांना आवश्यक माहिती न देण्याबरोबरच आयुक्तांनाही तब्बल 19 दिवसांनी खुलासा देत आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणार्या उद्यान अधीक्षक आणि मुख्य कारकुनाला आयुक्तांनीच सक्त ताकीद दिली आहे. प्रकाश मोगल गायकवाड असे उद्यान अधीक्षकाचे तर लक्ष्मण तुकाराम डगळे असे मुख्य लिपिकाचे नाव आहे.
माहिती अधिकार भोवला
गायकवाड महापालिकेच्या उद्यान विभागात उद्यान अधीक्षक तथा वृक्षसंवर्धन विभागाचे जन माहिती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जागृत नागरिक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष नितीन शशिकांत यादव यांनी त्यांच्या संस्थेशी संलग्न असलेल्या अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार समितीमार्फत उद्यान विभागाशी संबंधित माहिती माहितीच्या अधिकारात मागितली होती. ही माहिती मुदतीत न देता उलट माहितीसाठी एक लाख रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले.
तब्बल 19 दिवसांनी खुलासा
माहिती न मिळाल्याने यादव यांनी केलेले अपील निकाली न काढणे, अपील सुनावणीला गैरहजर राहणे, अर्जदाराला भयभीत करणे, धमक्या देणे, नागरिकांशी गैरवर्तन करणे आदी बाबी घडल्या. त्यावर नितीन यादव यांनी आयुक्तांकडे तक्रार केली असता त्यांनी अतिशीघ्रतेने अहवाल सादर करण्याचे आदेश गायकवाड यांना दिले. मात्र, या आदेशालाच केराची टोपली दाखवित गायकवाड यांनी अहवाल सादर करण्यास तब्बल एकोणीस दिवस विलंब लावला.
कारवाईचा इशारा
गायकवाड आणि मुख्य कारकून डगळे यांची शासकीय सेवक म्हणून कर्तव्यपरायणता संशयास्पद, हलगर्जीपणाची आणि अशोभनिय आहे, असा आरोप ठेवत या दोघांनाही सक्त ताकीद देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यापुढे कार्यालयीन कर्तव्यपालनात कसूर केल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.