आयुक्तांचा लाचखोर स्टेनो एसीबीच्या जाळ्यात

0

पिंपरी-चिंचवड : इमारतींचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी 12 लाखांची लाच मागत ती स्वीकारणार्‍या पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या लाचखोर स्टेनोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेे. ही कारवाई सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास महापालिका प्रशासकिय इमारतीच्या चौथ्या माळ्यावर करण्यात आली. राजेंद्र शिर्के असे अटक करण्यात आलेल्या आरोपी स्टेनोचे नाव असून पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिर्के असे अडकले जाळ्यात
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे थेरगाव येथे 11 इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यापैकी 7 इमारतींचे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला त्यांना देण्यात आलेला आहे. दरम्यान, उर्वरित चार इमारतींचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखल्याची फाईल सादर करून ते मिळवून देण्यासाठी शिर्के यांनी 12 लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार व्यावसायिकाने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी महापालिका मुख्यालयातील चौथ्या मजल्यावर सापळा रचला. संबंधित बिल्डरकडून 12 लाखांची लाच घेताना शिर्के याला रंगेहाथ पकडले.

2 लाखांचीच कॅश बाकी कोरे कागद
तक्रारदार व्यावसायिकाने शिर्के यांना जाळ्यात ओढण्यासाठी 12 लाख रुपयातील केवळ वरील दोन लाख रूपयांची रक्कम व उरलेले 10 लाखांचे केवळ कोरे कागद नेले होते, हे विशेष. ही कारवाई अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिलीप बोरसटे, उपअधीक्षक सुनील यादव, पोलिस निरीक्षक अरुण घोडके, तपास अधिकारी उत्तरा जाधव यांच्या पथकाने केली. शिर्के यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.