आयुक्तांचे आश्‍वासनांवर आंदोलन मागे

0

मुंबई । मुंबई महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध संघटनांच्या कृती समितीतर्फे प्रलंबित विविध मागण्यांसाठी सोमवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी, पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी, कर्मचारी व अधिकारी यांच्या मागण्यांबाबत चर्चेद्वारे तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिल्याने त्यावर कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी समाधान व्यक्त केले.

या मोर्चात, पालिकेच्या विविध खात्यातील कर्मचारी, अभियंते, शिक्षक, सफाई कर्मचारी, नर्स, तंत्रज्ञ, कंत्राटी कर्मचारी आदींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यामुळे पालिकेच्या विविध खात्यातील कामकाजावर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून आला. बायोमेट्रिक हजेरी पद्धती, आरोग्य गटविमा योजना, वेतन करारातील थकबाकी नवीन वेतन करार करणे, रस्ते सफाईसाठी यांत्रिक झाडू पद्धती बंद करणे, सर्व रिक्त पदे भरणे, कर्मचार्‍यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना व आवास योजनेमार्फत मालकी हक्काची घरे देणे, आदी प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी व अधिकारी यांनी पालिका मुख्यालयावर इशारा मोर्चा काढला. या मोर्चामध्ये कामगार नेते बाबा कदम, सुखदेव काशिद, साईनाथ राजाध्यक्ष, सत्यवान जावकर, दिवाकर दळवी, के. पी. नाईक, अ‍ॅड. महाबळ शेट्टी, अ‍ॅड. प्रकाश देवदास, रमेश जोशी, बा. शी. साळवी, सूर्यकांत पेडणेकर, सुभाष पवार आदी नेते सहभागी झाले होते.