जळगाव । ममुराबाद रोडवरील नाल्याचा मार्ग वळवणे बंदिस्त केल्याप्रकरणी प्रकरण कारवाईच्या टप्प्यात आलेले असताना ले-आऊट मंजुरीची महत्त्वाची फाईल पालिकेतून गहाळ झाली आहे. ममुराबाद रोडलगत श्रीश्री इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या माध्यमातून बांधकाम करण्यात आले आहे. बांधकाम करतांना नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला तसेच नाला बंदिस्त केल्याप्रकरणी अॅड. विजय भास्कर पाटील यांनी तीन महिन्यांपूर्वी आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर आयुक्तांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन नाल्याची पाहणी केली होती. त्यात नाल्याच्या प्रवाहाबाबत वेगवेगळ्या पातळीवर पडताळणी करण्यात आली होती. दरम्यान विकासक श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर यांनी बाजू मांडण्यासाठी काही कागदपत्रांची पालिकेकडे मागणी केली आहे. मात्र, विकासकाला अपेक्षित असलेली कागदपत्रे देण्यासाठी पालिकेकडे संबंधित फाइल उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. या ठिकाणच्या लेआऊटची फाईल 3 जुलै पर्यंत न सापडल्यास नगररचनाकार यांनी 4 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त सोनवणे यांनी दिले आहेत.
बांधकाम परवानगी तपासा
नाल्यावरील टाकलेला स्लॅब हा नियमबाह्य असल्याने तो तातडीने काढण्याचे आदेश आयुक्त सोनवणे यांनी आज दिले आहेत. स्लॅब काढला नाही तर जोराचा पाऊस झाल्यास पाण्याचा निचारा न झाल्याने ते पाणी तुंबून नागरी वस्तीत घुसेल. तरी स्लॅब तोडून टाकवा असे आदेश दिला आहे. तसेच पूर्वेकडील नाला किती फुट होता यासाठी लेआऊट फाईल मागितली असता ती सापडत नाही, हे धक्कादायक असल्याचा निष्कर्ष श्री. सोनवणे यांनी काढला आहे. या जागेवर प्रत्यक्ष भेट दिली असता शहराकडून नाला उत्तरेस वाहतो. स्मशानभूमी पूर्वी डावीकडे शिवाजीनगरला जाण्याचासाठी एक पुल आहे. त्या पुलाचे ठिकाणी जागा पहाणी केली असता तेथून दोन प्रवाह तयार झाले व स्मशानभूमीच्या पुर्वेकडून व पश्चिमेकडून ते प्रवाह उत्तरेकडे वाहत जातात. पूर्वेकडून वाहणारा नाला हा सुध्दा पश्चिमेकडून वाहणार्या नाल्याइतकाच रुंद असल्याचे दिसत आहे. त्यानुसार पूर्वेकडील नाला रूंद करून त्यानुसार बांधकाम परवानगी तपासण्याचे आदेश दिले आहेत.