जळगाव। जळगाव जिल्हा जागृत जनमंचतर्फे महापौर नितीन लढ्ढा यांना निवेदनाद्वारे आयुक्त जीवन सोनवणे यांचा कार्यकाळ वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. जीवन सोनवणे यांनी त्यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात कर्मचार्यांची शिरगणती केल्याने बोगस व कामचुकार कर्मचारी ओळखून कमी केले आहेत. भ्रष्ट कर्मचार्यांवर कारवाई केली, दिर्घकाळ प्रलंबित अस्थायी वाहनचालकांना नियमानुसार कायमसेवेत घेतले. तसेच दिर्घकाळ ठाण मांडून बसलेल्या कर्मचार्यांची अन्यत्र ठिकाणी बदली केली. शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न लोकशाही व सौम्य मार्गाने हाताळला आहे.
घरकुल कर्जमुक्तीबाबत प्रयत्न
घरकुल कर्जमुक्तीबाबत अभ्यासपूर्ण अपील सरकारकडे मांडल आहे. अशा सारख्या समाजउपायोगी व मनपाच्या हिताचे निर्णय घेत असल्याने जीवन सोनवणे यांची सेवा निरंतर ठेवून त्यांना मुदत वाढ देण्याच्या महापौर व महासभेच्या मागणीचे समर्थन करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सोनवणे यांनी हाती घेतलेले काही कामे अपूर्ण असून ती कामे चांगल्यारित्या पूर्ण करण्यासाठी आयुक्त सोनवणे यांना मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे.
तसेच गरज पडल्यास आयुक्तांच्या समर्थनार्थ नागरिकांच्या सह्यांचे अभियान राबवण्यास इच्छुक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शिवराम पाटील, कॉ. अनिल नाटेकर, गुरूनाथ सैंदाणे यांच्या सह्या आहेत.