आयुक्तांनी राबविला नागपूर पॅटर्न

0

उपमहापौर मोरे यांनी केला विरोध

पिंपरी : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 मधील कै. अंकुश बोर्‍हाडे विद्यालयाची इमारत एका खासगी संस्थेला विनामूल्य वापरास देण्याचा ठराव महापालिका आयुक्तांनी उद्या होणार्‍या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. मात्र, याबाबत स्थानिक नगरसेवकांना कल्पना दिली गेली नसल्यामुळे उपमहापौर शैलजा मोरे यांनी आयुक्तांच्या या नागपूर पॅटर्नवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी विरोध केल्यानंतर संस्थेची व्यवस्था अन्य ठिकाणी करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.

उपमहापौर संतापल्या
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागांतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. शहरातील मतिमंद, गतिमंद मुलांच्या विकासासाठी झेप पुनर्वसन केंद्र या संस्थेने महापालिकेच्या जागेची मागणी केली आहे. त्यानुसार आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी संस्थेला उपमहापौर मोरे यांच्या प्रभाग 15 मधील कै. अंकुश बोर्‍हाडे विद्यालयाची जागा विनामुल्य तत्वावर दिली. याबाबत ठराव तयार करून उद्या बुधवारी (दि. 20) होणार्‍या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. मात्र, याची पूर्वकल्पना स्थानिक नगरसेवकांना दिली नाही. त्यामुळे विषयपत्रिकेवर हा विषय पाहताच उपमहापौर मोरे यांनी आयुक्तांवर संताप व्यक्त केला.

उपमहापौरांच्या विरोधानंतर आयुक्त श्रावण हार्डीकर आणि पक्षनेता एकनाथ पवार यांनी यावर चर्चा करून संबंधित संस्थेला मासुळकर कॉलनीतील पालिकेची जागा वापरण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला माहिती न कळविता एखाद्या संस्थेला जागा देण्याचा निर्णय घेणे प्रशासनाला शोभत नाही. आयुक्तांनी याची पुर्वकल्पना आमच्या चार नगरसेवकांपैकी कोणालाही देणे आपेक्षित होते, असे उपमहापौर मोरे म्हणाल्या.