आयुक्तांविरुद्ध शिवसेनेचा अविश्‍वास ठराव मांडणार

0

मुंबई । मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेला विश्‍वासात न घेता परस्पर कारभार करणार्‍या आयुक्त अजोय मेहता यांच्या विरोधात अविश्‍वास आणण्याच्या हालचाली शिवसेनेने सुरु केल्या आहेत. आयुक्त नगरसेवकांचे ऐकत नसल्याच्या तक्रारी यापूर्वी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केल्या होत्या. हा वाद पुन्हा उफाळून आल्याने आयुक्तांना विरोधात शिवसेनेमध्ये सामना रंगणार आहे. मुंबई महापालिकेत पालिका आयुक्त सत्ताधारी शिवसेनेला विश्‍वासात न घेता कारभार करीत आहेत, असा आरोप सुरू असतानाच शुक्रवारीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित स्वच्छता हीच सेवा हे अभियान राबविण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या महापौर विश्वनाथम महाडेश्वर यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकून निषेध व्यक्त केला. तसेच आयुक्तांच्या या मनमानी कारभाराविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरु केल्या. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी प्रोटोकॉल राखला पाहिजे. सर्व सदस्यांचाही सन्मान राखायला हवा, असे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.