पिंपरी-चिंचवड : महापालिकेत रुजू झाल्यापासून आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर भाजपचे प्रवक्ते असल्याचा आरोप होत होता. भाजपच्या प्रचंड दबावाखातर आयुक्त कामकाज करतात. जात पडताळणी वेळी भाजप नगरसेवकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ, शिवसेना कक्षातील संगणक काढूने नेणे, भाजपच्या सत्ताबाह्य व्यक्तिची उठबस…प्रत्येकवेळी बोटचेपी आणि भाजपला पुरक भुमिका ते घेत असल्याचे त्यांच्यावर आरोप केले जातात. आता तर रस्ते विकासातील भ्रष्टाचार त्यांच्या सहमतीनेच झाला असल्याचा, आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे आयुक्तांविषयी संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. तसेच आजवर आयुक्त भाजपचे प्रवक्ते असल्याचा विरोधक आरोप करत होते. आता तर आयुक्त हे भाजपचे ’घरगडी’ झाले असल्याची, उपाधीच शिवसेनेने दिली आहे.
नेहमीच बोटचेपी भूमिका
महापालिकेत भाजपची सत्ता आली आणि मुख्यमंत्र्यांनी आपले विश्वासू म्हणून हर्डीकर यांची नागपूरहून बदली करत आयुक्तीपदी बसविले. त्यामुळे रुजू झालेल्या दिवसांपासून हर्डीकर भाजपच्या जवळचे असल्याचे, बोलले जाऊ लागले. आयुक्तांनीही त्याच पद्धतीने निर्णय घेण्यास सुरुवात केली. त्यावरुन विरोधकांनी ते भाजपचे प्रवक्ते असल्याचे आरोप सुरु केले. आयुक्तांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा, असे सल्ले नगरसेवकांनी अनेकदा दिले. पदाधिकार्यांचे किती ऐकावे, कोणाच्या दबावाखाली किती काम करावे, याबाबत देखील सुनावले. परंतु, तरीही आयुक्तांच्या कार्यपद्धतीत बदल होताना दिसून येत नाही.
नेहमी सत्ताधार्यांच्या दबावाखाली
आयुक्तांची भुमिका अनेकदा वादातीत राहिली आहे. जात पडताळणी वेळी देखील भाजप नगरसेवकांना पुरक अशी भुमिका घेतली. भाजपच्या दबावाखाली काम करत आहेत. भाजपच्या सत्ताबाह्य केंद्राशी त्यांची उठबस असते, असा आरोप विरोधकांकडून केला जातो. सत्ताधार्यांना वेळ देतात आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी ते वेळ देत नाहीत. कामकाज करताना भाजपला पोषक अशी भुमिका त्यांच्याकडून वारंवार घेतली जाते. सत्ताधार्यांच्या दबावाखाली शिवसेना कार्यालयातील संगणक त्यांनी काढून घेतला होता. भाजपच्या दबावाखातर त्यांना कामकाज करणे अवघड झाले आहे, असा आरोप विरोधक करतात. 425 कोटींच्या रस्ते विकासात 90 कोटींचा भ्रष्टाचार त्यांच्या सहमतीनेच झाला असल्याचा, गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे त्यांच्याविशयी संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.
कामकाजात बदल हवा
महापालिकेत पालिकेत येण्याच्या अगोदर आयुक्तांचे कार्य चांगले होते. त्यांनी चांगली कामे केली आहेत. परंतु, पिंपरी महापालिकेतील चुकीच्या पदाधिकार्यांच्या नादी लागून ते चुकीच्या पद्धतीने कामकाज करत आहेत. त्यांनी कामकाज करण्याच्या पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे, असे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले.