पिंपरी चिंचवड : पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक फौजदार, हवालदार, नाईक, शिपाई संवर्गातील 181 कर्मचार्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. याबाबतचा आदेश अप्पर आयुक्त मकरंद रानडे यांनी काढले. बदल्या केलेल्या कर्मचार्यांमध्ये नियंत्रण कक्षातील 143, चाकणमधील तीन, सांगवीतील 12, देहूरोडतील सहा, चिंचवडमधील चार आणि एमआयडीसी भोसरीतील 13 कर्मचार्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्या देहूरोड, एमआयडीसी भोसरी, भोसरी, चाकण, चाकण वाहतूक, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, हिंजवडी, हिंजवडी वाहतूक, आळंदी, दिघी, चिंचवड, वाकड, विशेष शाखा आणि पडताळणी (विशेष शाखा) यामध्ये बदल्या केल्या आहेत.
अजुनही अपुरे मनुष्यबळ
पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यापासून मागणीच्या प्रमाणात मनुष्यबळ पुरविण्यात आले नाही. त्यामुळे आयुक्तालयाच्या विविध शाखा सुरू करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. उपलब्ध मनुष्यबळाच्या जोरावर संपूर्ण कारभार हाकायचा असल्याने पोलीस आयुक्त आर के पद्मनाभम यांनी स्मार्ट उपक्रम सुरू करत पोलीस समाजात असल्याचे चित्र निर्माण केले आहे. अनेक पोलीस ठाण्यात वाहनांपासून मनुष्यबळापर्यंत अनेक गोष्टींची कमतरता आहे. वाहने आणि अन्य सुविधा तात्काळ उपलब्ध करणे सध्या सोयीचे नाही, परंतु आहे त्या मनुष्यबळाच्या जोरावर आणखी चांगले काम करत येऊ शकेल, असा विश्वास पोलीस आयुक्तांना असल्याने त्याच पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या आहेत.