आयुक्तालयासाठी शाळा देण्यास विरोध

0

प्रेमलोक पार्कमधील जागा दिल्यास विद्यार्थ्यांसह पालकांसोबत आंदोलन करणार
नागरी हक्क सुरक्षा समितीचा विरोध

पिंपरी-चिंचवड : शहरासाठी होणार्‍या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयास चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेची इमारत देण्यास नागरी हक्क सुरक्षा समितीने विरोध दर्शविला आहे. पोलीस आयुक्तालयास जागा दिल्यास विद्यार्थी पालकांसह जन आंदोलन करण्याचा इशाराही समितीने दिला आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

आयुक्तांना निवेदन
निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 एप्रिल रोजी घेतला आहे. त्यानुसार पोलीस आयुक्तलायासाठी जागा शोधण्याचे काम सध्या सुरू आहे. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी चिंचवड प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले इंग्रजी माध्यम शाळेच्या इमारतीची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे केली आहे.

इंग्रजी शाळेत गरिबांची मुले
गेल्या पाच वर्षांपासून या ठिकाणी महात्मा फुले इंग्रजी माध्यमाची शाळा भरत असून अंदाजे साडेसहाशे विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. या शाळेत शिकणारे बहुतांशी विद्यार्थी हे झोपडपट्टी, चाळीमध्ये राहणारे, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटकातील आहेत. अनेक विद्यार्थी घरकाम करणार्‍या, हातगाडीचा व्यवसाय करणार्‍या, असंघटीत क्षेत्रातील मजूर, कामगार आदी पालकांची मुले आहेत. या शाळेची इमारत पोलीस आयुक्तालयासाठी दिल्यास थेरगाव, वाल्हेकरवाडी, लिंक रोड, आनंदनगर, वेताळनगर आदी भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडणार आहे.

इतरत्र पर्याय शोधावा
एकीकडे शिक्षणातील गळती रोखण्याचे प्रयत्न राज्य सरकार करीत असताना, दुसरीकडे शिकणा-या मुलांच्या आयुष्यावरच नांगर फिरविण्याचे षड्यंत्र महापालिका रचित आहे. पोलीस आयुक्तालयासाठी शहरामध्ये अनेक पर्याय आहेत. पण, त्यासाठी साडेसहाशे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बोजवारा करू नये. प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेची इमारत पोलीस आयुक्तालयासाठी देऊ नये, त्यासाठी इतरत्र पर्याय शोधावा, अन्यथा विद्यार्थी, पालकांसह जन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, प्रदीप पवार, दिलीप काकडे, उमेश इमानदार, गिरीधारी लड्डा, अशोक मोहीते आदींनी दिला आहे.