मनपाची सभा तहकुब
धुळे – शहर महानगरपालिकेच्या आयुक्त, उपायुक्तानी दांडी मारल्याने मनपा स्थायी समितीची सभेला सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याची तक्रार करीत सदस्यांनी अधिकार्यांचा आग्रह धरल्याने अखेरीस सभा तहकूब करण्यात आली . पुढील सभेला सक्षम अधिकार्यांना उपस्थित राहण्याची सूचना करावी, असेही यावेळी सांगण्यात आले. शहर महानगरपालीकेची सार्वत्रिक निवडणूकीसाठी आगामी दोन तीन महिन्यात महिन्यात केव्हाही घोषणा होवू शकते. नुकतीच प्रभाग वार्डनिहाय आरक्षण जाहीर करण्याची सूचना प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे मनपाच्या स्थायी समितीची सभा वेळेवर घेण्यात यावी यासाठी महानगरपालीकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीत स्थायी समिती सभापती वालीबेन मंडोरे यांच्या अध्यक्षतेत सभा बोलविण्यात आली होती. स्थायी समितीच्या सभागृहात नियोजित वेळेत स्थायी समिती सभापती मंडोरेंसह प्र.सचिव मनोज वाघ, सहा.आयुक्त शांताराम गोसावी उपस्थित होत. मात्र सदस्यांनी मनपा आयुक्त अथवा उपायुक्त यांनी सभेला उपस्थित असावेत, असा आग्रह धरला.सक्षम अधिकारीच उपस्थित राहणार नसतील तर निर्णय कोण घेणार? घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी आदेश कोण काढणार? कारवाई काय झाली, त्यासंदर्भातली माहिती कोण देणार? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करीत सक्षम अधिकार्यांना बैठकीला बोलवा, त्यानंतरच कामकाज सुरु करण्यात यावे. असा आग्रह समितीच्या सदस्यांनी केला. आयुक्त, उपायुक्त दोघेही उपस्थित राहणार नसल्याने सहा.आयुक्तांना बैठकीस पाठविले, असा खुलासा नगरसचिवांनी करून पाहिला. मात्र त्यावर सदस्यांचे समाधान न झाल्याने आगामी बैठकीस सक्षम अधिकार्यांनी उपस्थित रहावे, अशी सुचना मांडत स्थायी समितीची बोलावण्यात आलेली सभा तहकुब करण्यात आली.