नाशिक: नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करवाढ रद्द करण्याच्या महासभेच्या ठरावाला केराची टोपली दाखवत आपल्याच ठरावाची अंमलबजावणी सुरू केल्याने भाजपच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. त्यामुळे मुंढेंविरोधात थेट अविश्वास ठरावाचे शस्त्र उपसले आहे. सोमवारी भाजपचे सभागृहनेते दिनकर पाटील यांनी मुंढेंविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस नगरसचिवांना सादर केली. त्यामुळे विशेष महासभा बोलविण्याचा अधिकार महापौरांकडे गेला असून महापौरांच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे.
शहरातील इंच, इंच जमिनी करवाढीच्या ओझ्या खाली आणलेल्या मुंढेंच्या विरोधात भाजपने आता अविश्वासाचे हत्यार उपसले आहे. अविश्वास प्रस्तावासाठी ८५ नगरसेवकांची गरज असून, भाजपचे ६६, मनसे ६ तर काँग्रेसचे ७ सदस्य अविश्वास ठरावाच्या बाजूने आहेत. १२२ पैकी ७९ नगरसेवक सध्या सोबत असून, राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात आहे. तर शिवसेनेची भूमिका आज ठरणार आहे. त्यामुळे अजूनही अविश्वासासाठी भाजपला ६ मतांची गरज भासणार आहे.