पिंपरी-चिंचवड : महापालिकेचे आयुक्त, मुख्य लेखापाल आणि मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी परदेश दौर्यावर आहेत. तर, पालिकेतील बरेच अधिकारी रजेवर गेले आहेत. त्यामुळे अगोदरच एकापेक्षा अधिक विभागांची जबाबदारी असलेल्या काही अधिकार्यांना आणखी एक प्रभारी पद सांभाळावे लागण्याची कसरत करावी लागत आहे. त्याचा फटका कामकाजाला बसत आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर हे स्वीडनच्या दौर्यावर आहेत. तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांची तडकाफडकी बदली झाली. त्यांच्या जागी नवीन अतिरिक्त आयुक्तांची अद्यापर्यंत नियुक्ती झाली नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पद रिक्तच आहे. अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार भांडार विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांच्याकडे देण्यात आला आहे. पालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे आणि मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण ’फिलिपिन्स’ दौर्यावर आहेत. मुख्य लेखापाल पदाचा अतिरिक्त पदभार लेखाधिकारी प्रशांत झनकर यांच्याकडे देण्यात आला आहे. सह आयुक्त दिलीप गावडे वैद्यकीय रजेवर गेले आहेत. त्यामुळे सह आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार सहायक आयुक्त विजय खोराटे यांच्याडे देण्यात आला आहे.
सह शहर अभियंता अय्युबखान पठाण देखील रजेवर आहेत. त्यांच्याकडील पदभार पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र दुधेकर यांच्याकडे देण्यात आला आहे. ’क’ प्रभागाचे क्षेत्रिय अधिकारी आणि जनता संपर्क विभागाचे प्रशासन अधिकारी आण्णा बोदडे हे देखील रजेवर आहेत. त्यांच्याकडील ’क’ क्षेत्रीय अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार प्रशासन अधिकारी प्रदीप मुथ्था यांच्याकडे देण्यात आला आहे. तर, जनता संपर्क विभागाचे काम मुख्य लिपिक रमेश भोसले हे पाहत आहेत.
प्रशासन अधिकारी आणि ’ब’ प्रभागाचे प्रभारी क्षेत्रीय अधिकारी संदीप खोत हे देखील रजेवर आहेत. त्यांच्याकडील पदभार प्रशासन अधिकारी श्रीनिवास दांगट यांच्याकडे देण्यात आला आहे. क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि ’फ’ प्रभागाचे प्रभारी क्षेत्रीय अधिकारी मनोज लोणकर हे सुद्धा रजेवर आहेत. त्यांच्याकडील ’फ’ क्षेत्रीय अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर यांच्याकडे दिला आहे. तर, क्रीडा विभागाचा अतिरिक्त पदभार प्रशासन अधिकारी राजेश जगताप यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.