पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर एक चांगले कलाकार देखील आहेत, याचा प्रत्यय महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आला. आयुक्तांनी एका काल्पनिक राजकीय पुढार्याच्या भाषणाची मिमिक्री करत कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली. आयुक्तांच्या कलेला उपस्थित पदाधिकारी, अधिकारी व कर्मचार्यांनी दाद दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 36 व्या वर्धापनदिनानिमित्त भोसरीतील कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृहात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे उपस्थित होते.
नेहमी धीरगंभीर, कधी हसमुख असणारे आयुक्त श्रावण हर्डीकर स्टेजवर उभे राहिले अन् त्यांनी चक्क मिमिक्री करण्यास सुरुवात केली. एका काल्पनिक राजकीय पुढार्याच्या भाषणामधून त्यांनी एका विषयावरून एकदम दुसर्या विषयावर जात केलेल्या असंबद्ध भाषणामधून उपस्थितांचे चांगले मनोरंजन झाले. त्यांच्या मिमिक्रीला पदाधिकारी, अधिकार्यांनी दाद दिली. या कार्यक्रमातून आयुक्तांमधील उत्तम कलाकार बाहेर आला आहे.