आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कक्षासमोर मनसेचे आंदोलन

0
खासगीकरण केल्यास न्यायालयात जाण्याचा दिला इशारा
पिंपरी : भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या कक्षासमोर आंदोलन केले. प्रशासन आणि सत्ताधारी भाजपच्या विरोधात मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्तेच्या बळावर भाजपच्या पदाधिका-यांनी भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणास मान्यता दिली. यासाठी अन्य पक्षाच्या गटनेत्यांना अथवा नगरसेवकांना विश्‍वासात घेतले नाही. भाजप पदाधिका-यांनी मनमानी आणि दंडमशाही करत रुग्णालयाच्या खासगीकरणाचा विषय रेटून नेला. सर्वसाधारण सभेत महापौर राहूल जाधव यांनी आम्हाला या विषयावर बोलू दिले नाही. त्यामुळे आमचा भोसरी रुग्णालयाच्या विषयाला विरोध आहे, अशी भूमिका मनसे गटनेते चिखले यांनी मांडली.
भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या विरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चिखले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या कक्षासमोर जोरदार आंदोलन केले. यावेळी पालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी रूपेश पटेकर, राजू सावळे, सुरेश सकट, के. के. कांबळे, रवी जाधव, मिना गटकळ, सीमा बेलापुरकर, रूपाली गिलबिले, स्नेहल बांगर, अनिता पांचाळ, संगिता देशमुख, दक्षता क्षीरसागर, प्राजक्ता गुजर, पंकज दळवी, गणेश पाटिल, रोहित काळभोर, मयूर हजारे यांच्यासह सुमारे 60 कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.
सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काचे भोसरी रुग्णालय खासगी संस्थेला चालविण्यासाठी देण्याचा भाजप पदाधिका-यांचा डाव आहे. रुग्णालयाचे खासगीकरण झाल्यास सर्वसामान्य नागरिकांचे उपचार महाग होणार आहेत. ते महागडे उपचार नागरिकांना परवडणार नाहीत. सत्तेच्या बळावर खासगीकरण केल्यास त्याच्या विरोधात मनसे न्यायालयात धाव घेईल.