पुणे । अॅलोपॅथीमध्ये अनेक मर्यादा आणि उपचारांचे दुष्परिणामही आहेत. आयुर्वेदिक उपचारांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. शिवाय, सर्व प्रकारच्या आजारांवर आयुर्वेदात उपचारपद्धती आहे. त्यामुळे आयुर्वेदाला आपण सर्वानी प्राथमिकता द्यायला हवी व आयुर्वेद सामान्यातल्या सामान्य नागरिकापर्यंत पोहोचायला हवे, असे मत पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी व्यक्त केले. वैद्य प. य. उर्फ दादा खडीवाले लिखित आणि डायमंड पब्लिकेशन प्रकाशित ’आयुर्वेदीय वनौषधी’ (सचित्र वनस्पतींची उपयुक्तता), ’सहजसोपे घरगुती आयुर्वेदीय उपचार’ आणि ’एटूझेड आरोग्यवर्धिनी’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिरात डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पत्नी गिरीजा बापट, डायमंड प्रकाशनाचे दत्तात्रय पाष्टे, पत्रकार ज्योत्स्ना कुलकर्णी, वैद्य विनायक खडीवाले, वैद्य संगीता खडीवाले, वैद्य विवेक साने आदी मान्यवर उपस्थित होते.
आयुर्वेदिकला प्राधान्य द्या
अॅलोपॅथीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने अनेकदा त्याचा विपरीत परिणाम होतो. अनेक डॉक्टर पैसे मिळविण्याच्या नादात अॅलोपॅथी उपचार आणि अँटिबायोटिक्स देण्यावर भर देतात. यामध्ये आयुर्वेदिक आणि होमीयोपॅथीक डॉक्टर्सचाही समावेश असतो. आजही फॅमिली डॉक्टरची संकल्पना आहे. त्यामुळे लोक पाहिल्यान्दा जनरल प्रॅक्टिशनरकडे जातात. तेथे आयुर्वेदिकला प्राधान्य द्यायला हवे. त्यासाठी तशा प्रकारचा कायदा अंमलात आणायला हवा, असे धेंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
वनौषधी फायदेशीर
काही आजारांना अॅलोपॅथीपेक्षा आयुर्वेदिक उपचार प्रभावी ठरतात. अनेकदा मी माझ्याकडे आलेल्या रुग्णांना आयुर्वेदिक उपचार सुचवितो. तात्काळ उपचारासाठी आधुनिक वैद्यकशास्त्र गरजेचे असले, तरी आजार कायमचा बरा होण्यासाठी आयुर्वेदिकच उपयुक्त ठरते. वनौषधींचा चांगला उपयोग होतो, असे डॉ. गजानन एकबोटे यांनी सांगितले. वैद्य संगीत खडीवाले यांनी सूत्रसंचालन तर वैद्य विनायक खडीवाले यांनी आभार मानले.
दादांनी उलगडला घरगुती उपचारांचा बटवा
पुस्तकांच्या प्रकाशनानंतर वैद्य दादा खडीवाले यांचे ’सर्वांसाठी आयुर्वेद’ विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. उपस्थित सर्व लोकांच्या शंकांचे निरसन करताना घरच्या घरी आयुर्वेदिक उपचार करणे कसे सोपे आहे, हे सांगितले. सर्दी-खोकल्यापासून तर कर्करोगासारख्या आजारावर आयुर्वेदात उपचार आहेत. बरेच आजार दवाखान्यात न जाताही आपले आपण कसे उपचार घेऊन बरे करू शकतो, यावर दादांनी प्रकाश टाकला. घरगुती उपचारांचा बटवा त्यांनी उपस्थितांच्या प्रत्येक प्रश्नागणिक खुला केला. डोकेदुखी, सर्दी-खोकला, मूळव्याध, त्वचाविकार, ऍलर्जी आणि अशा वेगवेगळ्या आजारांवर उपस्थितांनी शंका विचारात दादांकडून उपचार जाणून घेतले.