आयुषी पायघन राज्यात सीबीएसई दहावीत प्रथम

0

जळगाव। दहावीच्या सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच सीबीएसई परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. सीबीएसई बोर्डाचा पाच विभागांचा निकाल जाहीर झाला आहे. दिल्ली, चेन्नई, अलाहाबाद, देहरादून, त्रिवेंद्रम या पाच राज्यांचा निकाल यंदा 90. 95 टक्के लागला आहे गेल्यावर्षी 96.21 टक्के निकाल लागला होता. सीबीएसईच्या 12 वीच्या निकालानंतर दहावीची मुले निकालाची वाट पाहत होती. जिल्हाभरातल्या शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. राज्यातून जळगाव येथील डॉ. राजेंद्र पायघन यांची मुलगी तथा रूस्तमजी इंटरनॅशल स्कुलची विद्यार्थिनी कु. आयुषी पायघन हीने 500 पैकी 498 गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.

सुरूवातीपासून अभ्यास करीत आल्याने मला पेपर चांगल्या प्रकारे लिहिता आले. शिक्षकांकडून नेहमी प्रोत्साहन व सहकार्य मिळाले. भविष्यात मेडिकलमध्ये करीयर करण्याची इच्छा. माझ्या यशात आई – वडिलांचा मोठा वाटा असल्यामुळे यश गाठता आले.
कु. आयुषी पायघन

सुरुवाती पासून आयुषी अभ्यासात रमलेली असायची तिच्या शाळेच्या प्राचार्यांचे चांगले सहकार्य नेहमी असायचे त्यामुळे तिला यश संपादन करता आले . इतर खेळामध्ये तसेच कार्यक्रमात नेहमी चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स द्यायची शाळेचा स्टुडंट ऑफ द इयर, बेस्ट ऑफ गाईड असे पुरस्कार तिला आतापर्यत मिळाले आहे. आम्ही दोघे डॉक्टर असल्याकारणाने तीदेखील मेडिकल क्षेत्रात जाणार आहे.
आयुषीचे वडील – डॉ. राजेंद्र पायघन

डॉ दिप्ती पायघन म्हणून नाही तर आयुषी पायघनची आई असल्याची अधिक ओळख मला मिळाली आहे. आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. ती अभ्यासात नेहमी सक्रीय असायची मी फक्त तिची काळजी घेतली असून अभ्यासाची काळजी ती स्वत: घ्यायची शाळेतील समुहाचे आयुषीला चांगले सहकार्य मिळाले आहे. नेहमी अभ्यासात असल्याने तिला चांगले यश मिळाले आहे.
आयुषीची आई – डॉ. दीप्ती पायघन