मुंबई : आयुष्यमान खुराणा आणि सान्या मल्होत्रा यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘बधाई हो’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई तर केलीच मात्र यासोबतच आयुष्यमानच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटांत सर्वाधिक हिट चित्रपटही ठरला.
‘बधाई हो’या चित्रपटाने एका आठवड्यातच ६६ कोटींचा गल्ला जमवला आहे. याआधी ऑक्टोबरमध्येच प्रदर्शित झालेल्या आयुष्यमानच्या ‘अंधाधून’ या चित्रपटाने ६१ कोटींची कमाई केली होती. ‘बधाई हो’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केलेल्या या धमाकेदार कमाईविषयी चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटरवरुन सांगितले, आयुष्यमानचा ‘बधाई हो’ आणि अर्जुन कपूरचा ‘नमस्ते इंग्लंड’ हे दोन्ही चित्रपट १८ ऑक्टोबरला प्रदर्शित झाले. त्यामुळे, या चित्रपटांच्या टक्करमध्ये बाजी कोण मारणार याकडेच प्रेक्षकांचे लक्ष लागलेले होते. अशात आता आयुष्यमानच्या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकत बॉक्स ऑफिसवर ६६ कोटींचा गल्ला जमवला आहे. आता हा चित्रपट १०० कोटींचा आकडा पार करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.