कल्याण । नटसम्राट चित्रपटात जन्मदात्या पित्याला मुलांनी बेघर केल्याचे दृश्य आहे. शहरात 3 मुलांनी जन्मदात्रीलाच अशाच रीतीने घरातून बाहेर काढत भिकार्यासाखे जगायला लावल्याची घटना समोर आली आहे. आईलाच मुलांनी नाकारल्याने तिच्यावर उतारवयात नामुष्की आणि निराधार जीवन जगण्याची वेळ आली आहे. अशावेळी निराधार झालेल्या मातेला पोलिसांनी मायेचा आधार दिला आहे. विशेष विपन्नावस्थेत जगणार्या या मातेची दोन्ही मुले चांगल्या ठिकाणी नोकरीत आहेत. पोलीस म्हटले की त्यांच्याबद्दल नकारात्मकच चर्चा करणारे जास्त आढळतात. मात्र, मातृत्वाचा अनादर करणारी घटना समोर आली असताना पोलीस हे मदतीला धाऊन आले आहेत. कल्याण पश्चिमेतील लालचौकी परिसरात रस्त्याच्या कडेला वृद्ध महिला पडून होती. त्याबाबतचा कॉल नियंत्रण कक्षाने आल्यानंतर त्याची माहिती तत्काळ लालचौकी परिसरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याला कळवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले.
पाय सुजलेल्या अवस्थेत वृद्ध महिला रस्त्यात पडून होती. तिला प्रथम रुग्णवाहिकेतून महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्रथम उपचार सुरू केले. तिला विचारपूस केली असता 65 वर्षीय या वृद्धेने तिचे नाव रमाबाई दत्तात्रय खंडागळे असल्याचे सांगितले. तिचे नातेवाईक कोणी वारस आहेत का? याच्याविषयी विचारणा केली असता या महिलेने 2 मुले असून एक मुलगी असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी रिक्षा केली आणि तिच्या मुले व मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. दिवसभराच्या शोधानंतर पोलीस तिच्या 2 मुलांच्या घरी पोहोचले. तिच्या एका मुलाचे नाव जितेंद्र तर दुसर्या मुलाचे नाव विनोद असे आहे. त्यांनी रमाबाई ही त्यांची आई असल्याचे कबुली दिली. मात्र, तिला आमच्याकडे आणू नका, असे या मुलांनी सांगितले. सूनांनीही सासूंना घरी आणू नका, असे सांगितले. त्यामुळे पोलीसही हतबल झाले.
मुलगी नर्सचे काम करते, आईची शुश्रुषा करण्यास नकार
नोकरीत असलेल्या मुलांनीही त्यांच्या आईला असे नाकारल्यानंतर पोलिसांनी पुढची वाट धरली. या पोलिसांनी वृद्ध महिलेच्या मुलीचा शोध घेतला. तेव्हा पोलिसांना एक शेवटची आशा होती. मात्र, रमाबाईची विवाहित मुलगी हिनेही आईला माझ्या घरी आणू नका, असे बोलताच पोलिसांचे अवसान गळाले. मीनाक्षी ही नर्सचे काम करते. मात्र, आईची शुश्रुषा करण्याची तिला लाज वाटते का, असाच प्रश्न पोलिसांनाही पडला. अखेर पोलीस या वृद्ध महिलेचे वारस झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांनी स्व:खर्चाने रमाबाई यांना ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले आहे.