आयुष्यातील अपयशही साजरे करा : खेर

0

पुणे । माझ्या बालवयात घडलेल्या अपयशाच्या प्रसंगात माझ्या कुटुंबीयांनी मला कायम प्रोत्साहन देत माझे अपयश एका वेगळ्या पद्धतीने साजरे केले. त्यामुळे माझ्या मनातील अपयशाची भीती जाऊन यशाचा मार्ग सुकर झाला. त्यामुळे आपल्या आयुष्यातील अपयश साजरे करा आणि यशाकडे जाण्याची एक संधी म्हणून त्याकडे बघा, असे मत ज्येष्ठ अभिनेते, एफटीआयआयचे अध्यक्ष अनुपम खेर यांनी व्यक्त केले.

रोटरी डिस्ट्रीक्टच्या वतीने हडपसर अमनोरा टाऊनशिप येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रोटरी डिस्ट्रीक्टचे अभय गाडगीळ, दीपा गाडगीळ यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते. देवाने या जगात पाठविताना आपल्या सर्वांमध्ये काहीना काही वेगळेपण दिले आहे. आपण मात्र आपल्यातील हे वेगळेपण विसरतो आणि तिसर्‍याच गोष्टींमागे धावत त्यात आनंद शोधतो. हे चुकीचे असून आपल्यातील स्वत:ला ओळखत त्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. सामान्यांमधून देखील असामान्य होण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे खेर यांनी नमूद केले. आज आपण स्वत:पासूनच दुरावत चाललो असून लोकांशी नाही तर लोकांबद्दल बोलण्यात धन्यता मानतो हे टाळत स्वत:चा विचार करा, तुमची मते काय आहेत ती समजून घेऊन वागण्याचा प्रयत्न करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. लहान असताना अभिनय क्षेत्रात अपयश येत असतानाही माझ्या प्रयत्नांचे कौतुक करीत घराच्या सर्वांनीच मला पाठबळ दिले. याच अपयशातून मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून सुवर्णपदक घेऊन बाहेर पडलो. माझ्या घरच्यांनी जर माझे अपयश माझे प्रयत्न म्हणून घेतले नसते तर आज कदाचित मी अभिनेता नसतो.