आयुष्यात आता पुरस्कारांची वेळ निघून गेली

0

नवी दिल्ली | आयुष्यात आता पुरस्कारांची वेळ निघून गेली आहे. त्यामुळे माझ्यासाठी या साऱ्या क्षुल्लक गोष्टी आहेत. बीसीसीआयच्या नवीन समितीने माझी निवड केली, ही चांगलीच गोष्ट आहे. याबद्दल मी आनंदी असून बीसीसीआयचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया देत माजी फिरकीपटू पद्माकर शिवलकर यांनी जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्यावर मनातील खदखद व्यक्त केली. मुंबईकडून खेळताना त्यांनी बरेच सामने एकहाती गाजवले, पण या कामगिरीच्या जोरावर त्यांना भारतीय संघात प्रवेश मिळू शकला नाही. ही सारी चीड अजूनही शि
वलकर यांच्या मनात असल्याचेच दिसून आले. सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार मला जाहीर करण्यात आला, हे मला प्रसारमाध्यमांमधूनच समजले. त्यानंतर बऱ्याच जणांनी अभिनंदनही केले. पण बीसीसीआयचे याबाबतीतले अधिकृत पत्र मात्र अजूनही आलेले नाही, असे शिवलकर यांनी सांगितले.

मी गत आठवणींमध्ये रमणारा माणूस नाही
शिवलकर म्हणाले की, ‘मी गत आठवणींमध्ये रमणारा माणूस नाही. जे घडले ते आठवण्यात काय हशिल आहे? एक रणजी स्पर्धेची अंतिम फेरी आठवते. त्या सामन्यात मद्रासचा संघ आमच्यासमोर होता. त्या सामन्यात आम्ही त्यांना ६० धावांत गुंडाळले होते.’ शिवलकर यांच्याबरोबर रजिंदर गोयल यांनाही पुरस्कार जाहीर केला आहे. गोयल यांच्याकडेही कमालीची गुणवत्ता असली तरी त्यांना संधी मिळाली नाही. या पुरस्काराबाबत विचारल्यावर ते म्हणाले की, ‘कधीही न मिळण्यापेक्षा उशिरा पुरस्कार दिला जाणे वाईट नक्कीच नाही. मला हा सन्मान दिल्याबद्दल मी बीसीसीआयचा आभारी आहे. माझ्या योगदानाबद्दल त्यांनी दखल घेतली यामध्येच सारे काही आहे.’

महिला क्रिकेटसाठी मोठा सन्मान
बीसीसीआयने मला सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला. या वयात माझ्यासाठी हा पुरस्कार महत्त्वाचा नसेलही, पण महिला क्रिकेटला यामुळे उत्तुंग झेप घेणे शक्य होईल, असा आशावाद भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांनी व्यक्त केला. बीसीसीआयकडून माझा सन्मान होणे हे माझ्यासाठी महत्त्वपूर्ण नाही, पण महिला क्रिकेटसाठी मोठा सन्मान आहे. बीसीसीआयकडून ८ मार्च रोजी बंगळुरू येथे या पुरस्कारांचे वितरण होईल तेव्हा हा पुरस्कार स्वीकारणारी मी पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचा अशा प्रकारचा हा पहिलाच गौरव आहे. रंगास्वामी यांच्या नेतृत्वात भारताने पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली होती.