आयुष्यात खूप मोठ्ठ व्हायच्या स्वप्नापोटी बालक अमळनेरातून पोहचला पुण्यात

0

स्थानिक गुन्हे शाखेने लावला छडा, पुण्यातून घेतले ताब्यात ; 26 ऑगस्ट पासून 21 दिवस चहाच्या टपरीवर लागला होता कामाला

जळगाव ः वडील दुसर्‍याच्या शेतात शेतमजुरी करुन उदरनिर्वाह भागवितात. दहावी नापास झाल्याने मुलालाही शेती काम करण्याचा आग्रह धरला. चारण्यासाठी शेतमालकाने बकर्‍या घेवून दिल्या. मात्र शेती काम रुचत नसल्याने तसेच आयुष्यात खूप सारे पैसे कमवून मो÷ठ्ठ व्हायच स्वप्न बाळगून अमळनेर येथील 17 वर्षीय मुलाने घर, गाव सोडले. कटींग करुन येतो असे सांगून गेलेला मुलगा दोन ते तीन दिवस उलटूनही घरी परत न आल्याने मुलाच्या वडीलांनी पोलिसात तक्रार केली. अमळेनर पोलिसात दाखल अपहरणाच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने मुलाचा छडा लावून त्याला पुण्यातून ताब्यात घेतले आहे. स्वतः जमविलेल्या पैशांतून मुलगा पुण्याला पोहचला व याठिकाणी एका चहाच्या टपरीवर कामालाही लागला होता अशी माहिती समोर आली आहे.

कटींग करुन येतो असे सांगून निघाला घरुन
मूळ मध्यप्रदेशातील हरजा शंकर सोलंकी हे 10 ते 12 वर्षापूर्वी उदरनिर्वाहासाठी अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे स्थायिक झाले आहेत. पत्नी व दोन मुलांसह ते वास्तव्यास आहेत. दहीवद खुर्द येथील हिरालाल शांताराम पाटील यांच्या शेतात शेतमजुर म्हणून काम करतात. 26 ऑगस्ट रोजी हरजा यांचा मुलगा शेतात आला. त्याने मी दहीवद येथे जावून कटींग करुन येतो, असे सांगितले व निघून गेला. रात्र झाली तरीही परतला नाही. पावसाचे दिवस असल्याने कुटुंबिय अस्वस्थ झाले, शेतमालक पाटील यांच्यासह कुटुंबियांनी ठिकठिकाणी शोध घेतला. दोन ते दिवस त्याचा फोनही लावला. मात्र तो फोन घेत नसल्याने अडचणी वाढल्या. यानंतर हरजा सोलंकी यांनी मुलगा बेपत्ता झाल्याबाबत अमळनेर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.

अधीक्षकांकडून गंभीर दखल, तपासाच्या सुचना
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगल यांनी घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपअधीक्षक राजेंद्र ससाणे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम व अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना तपासाबाबत मार्गदर्शन करत बालकाला शोधून काढण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार विजय देवराम पाटील, नरेंद्र वारुळे, अमळनेर पोलीस स्टेशनचे सुनील रामदास पाटील या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे पुण्यातील चिंचवड भागातील भूमकर चौक परीसरातून शनिवारी बालकास ताब्यात घेतले.

मुलाला पाहताच आई वडीलांना अश्रू अनावर
26 ऑगस्ट पासून मुलगा घरुन निघून गेला होता. पत्ता लागू नये म्हणून मुलगा फोनही उचलत नव्हता. तो कुठे असेल, कसा असेल याच विचारात आई, वडीलांचे जेवण कमी झाले होते. मात्र पोलिसांनी त्याला पुण्यातून हुडकून काढले. तब्बल 21 दिवसांपासून चेहराही न बघितलेल्या मुलाला पाहताच आई, वडीलांना अश्रू अनावर झाले. त्याला कवेत घेतले. हा क्षण बघून कर्मचार्‍यांचेही डोळे पाणावले होते.