लो. टिळक विद्यालयाचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ
निगडी : मुलांनी सतत ध्येय मोठे ठेवून ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतल्यास यश अवघड नाही. मात्र आपले भविष्य घडविण्यात कसलीही कसूर न ठेवणार्या आई वडिलांना विसरता कामा नये. मोठेपणी त्यांची सेवा करा, असे प्रतिपादन डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. रंजना नवले यांनी केले. ताथवडे येथील लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी इनरव्हील क्लब ऑफ पिंपरी स्टारच्या अध्यक्षा राधिका माखन, सदस्या जुलेखा शिकलगार, सचिव प्रचीती पाटील, सिल्व्हिया डिसूजा, मीना विश्वकर्मा, युथ फाउंडेशनचे अध्यक्ष संजय लाखे, मुख्याध्यापिका अश्विनी बाविसकर, जाहिद अन्सारी, विद्यार्थी पालक शिक्षक उपस्थित होते.
विविध स्पर्धांचे आयोजन
प्रा. डॉ. नवले यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून विद्यार्थ्यांच्या बक्षिसांची जबाबदारी घेतली. सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट दिले. विद्यालयात वक्तृत्व, निबंध, वेशभूषा, चित्रकला, रांगोळी, बिनभांड्याचा स्वयंपाक, कबड्डी, खो-खो, दोरी उड्या, लंगडी, सायकल शर्यत, बॅडमिंटन, विज्ञान प्रकल्प, किल्ले आदी स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातील प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीस विजेत्या दीडशे विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक व बक्षिसे प्रदान करण्यात आली.
डॉ. नवले यांनी केली मदत
डॉ. रंजना नवले यांनी गरजू विद्यार्थ्यांची शालेय फी भरण्यासाठी दहा हजार रुपयांची मदत शाळेकडे सुपूर्द केली. इनरव्हील क्लब ऑफ पिंपरी स्टार यांनी स्वच्छता अभियानातंर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला व घोष वाक्य स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान केली. युथ फाउंडेशनचे अध्यक्ष संजय लाखे व त्यांच्या सहकार्यांनी क्रीडा साहित्य शाळेला भेट दिली. राधिका माखन यांनी ‘इतनी शक्ती हमी देना दाता’ ही प्रार्थना गाऊन विद्यार्थ्यांना त्या अर्थाप्रमाणे आचरण करण्यास सांगितले. सचिव प्रचीती पाटील यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. श्वेता पांढरे ह्या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त करीत उपस्थितांचेआभार मानले.
कार्यक्रमाचे संयोजन स्पर्धा विभाग प्रमुखा सुनीता घोडे यांच्यासह विजय पारधी, अंजली सुमंत, सुवर्णा भोईर अश्विनी मोरे यांनी केले तर सोनाली टिकले यांनी सूत्रसंचालन केले.