चाळीसगाव। पंचायत समिती मार्फत आयोजित स्वच्छ भारत अभियान कार्यशाळा व वैयक्तीक शौचालय अनुदान वाटप व शौचालय प्रशासकीय मंजूरी आदेश कार्यक्रम बुधवार 19 जुलै रोजी उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर आमदार उन्मेश पाटील, जि.प. अध्यक्षा उज्वलाताई पाटील, जि.प.सभापती पोपट भोळे, जि.प. सदस्य मंगलाताई जाधव, शशीकांत साळुंखे, भुषण पाटील, मोहिनी गायकवाड, अतुल देशमुख, पं.स.च्या सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, पं.स. सदस्य भाऊसाहेब पाटील, अजय पाटील, मायाबाई पाटील, रुपाली साळुंखे, सुनिता पाटील, शिवाजी सोनवणे, बाजीराव दोड, सुनिल महाजन, प्रितीताई चकोर, वंदना मोरे, नगराध्यक्षा आशालता विश्वास चव्हाण, उपविभागीय अधिकारी शरद पवार, तहसिलदार कैलास देवरे, जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे, औरंगाबाद जिल्हयातील आदर्श गाव पाटोदे येथील ग्रामपंचायत सदस्य भास्करराव पेरे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
अभियानाचे महत्व पटवून दिल्याने होतो विकास
प्रमुख वक्ते भास्कर पाटील यावेळी म्हणाले की, लोकांमध्ये जनजागृती करुन स्वच्छ अभियानाचे महत्व त्यांना पटवून दिल्यास आपले गाव शंभर टक्के हगणदारी मुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री यांचे स्वच्छ भारत हे स्वप्न फक्त सरपंच व ग्रामसेवक पूर्ण करु शकतात. या कामात गावाचे सरपंच व ग्रामसेवक यांची सर्वात मोठी जबाबदारी आहे. यासाठी त्यांनी तळमळीने काम करण्याची गरज आहे. शासनाच्या या योजनेत लोकांनी स्वयंफूर्तीने सहभागी व्हावे. यासाठी तालुका हगणदारी मुक्त करण्यासाठी महिला मंडळांना सोबत घेवून काम करावे. शौचालय फक्त बांधू नका तर त्याचा वापरही करा असेही त्यांनी सांगितले. श्री. पाटील स्वच्छ भारत व हगणदारी मुक्त गावाचे महत्व औरंगाबाद जिल्हयातील पाटोदा गावातील अनुभव विविध उदाहरण सांगून पटवून दिले.
विचार बदल्यासाठी इच्छाशक्तिची आवश्यकता
कृषि विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे यांनी आपल्या मार्गदशनपर भाषणात म्हणाले की, आपणास जे महत्वाचे बदल घडवायचे आहे ते आपण करु शकत नाही. बदल घडविण्यासाठी शिक्षणाची गरज नाही, गरज आहे ती इच्छाशक्तीची. ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांच्यासाठी कमी खर्चात, कमी जागेत शौचालय बांधता येतील. स्त्रीयांबाबत आपण मोर्चा काढतो, परंतू घरातील स्त्री शौचासाठी बाहेर जाते याबाबत आपण कधीच विचार करीत नाही. हा विषय किळसवाना जरी वाटला तरी आपली दिनचर्या यापासून सुरु होते. यासाठी आपण शौचालय बांधुन त्याचा वापर केला पाहिजे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हगणदरीमुक्तीसाठी नागरीकांचा संकल्प: आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार उन्मेश पाटील म्हणाले की, पंचायत समिती मार्फत राबविण्यात येणारे स्वच्छ भारत अभियान व हगणदारी मुक्त गाव हे काम फक्त शासनाचे नसून ते आपल्या सर्वांचे आहे. तालुका 100 टक्के हगणदारी मुक्त होण्यासाठी या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे. पाटोदा गाव तीन महिन्यात हगणदारी मुक्त होवू शकते तर आपला तालुका एक वर्षात हगणदारी मुक्त का होवू शकत नाही. यासाठी सर्व नागरीकांनी, महिलांनी 31 डिसेंबरपर्यंत आपला तालुका हगणदारी मुक्त करावा. यावेळी सर्व उपस्थितांना आमदारांनी तालुका हगणदारी मुक्त होण्याची शपथ दिली.
हगणदारी मुक्त गावांचा सन्मान
यावेळी हगणदारी मुक्त गाव म्हणून सन्मान मिळालेल्या 28 ग्रामपंचायतींचा सन्मान म्हणून गावाचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शौचालय बांधकाम प्रोत्साहनपर अनुदान रुपये 12,000 प्रमाणे 300 लाभार्थ्यांना 36 लाख तर प्रशासकीय मान्यता वैयक्तीक शौचालय मंजूर आदेश 5,000 लाभार्थ्यांना वाटपाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. ही कामे डिसेंबर, 2017 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यावेळी तालुक्यातील गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आदि उपस्थित होते.