कामगार विरोधी धोरणांचा निषेध
भुसावळ- 12809 व 12810 या रेल्वेगाड्यांमधील टपाल सेवा भुसावळ आरएमएस एल विभागाकडे पूर्ववत कायम ठेवावी या मागणीसाठी आरएमएसच्या रेल डाक सेवा अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण छेडण्यात आले आहे. उपोषणात सोमवारी दोन कर्मचार्यांनी सहभाग नोंदवला. मंगळवारपासून दररोज दोन कर्मचारी नव्याने या उपोषणात सहभागी होऊन उपोषणार्थींची संख्या वाढविणार आहेत.
मागण्या मान्य होईस्तोवर उपोषण
टपाल खात्याचे पोस्ट मास्तर जनरल यांनी भुसावळ एल डिव्हीजनच्या अख्यतारीत येणार्या एफ 26 सेक्शन अर्थात डाऊन 12809 सीएसएमटी हावडा मेल व 12810 अप हावडा सीएसएमटी ही गाडी नागपूर डिव्हीजनकडे वळवली आहे. यामुळे भुसावळ विभागातील कर्मचारी अतिरिक्त ठरणार असून नागपूर येथील आरएमएस कर्मचार्यांना 15 तास सलग काम करावे लागणार आहे. टपाल विभागाच्या या कामगार विरोधी आदेशामुळे कर्मचार्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे रेल्वे डाक टपाल सेवेतील एनएफपीई या संघटनेने सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. सदरील आदेश तातडीने रद्द करुन दोन्ही गाड्या भुसावळ विभागाला पूर्ववत जोडण्यात याव्यात यासाठी हे बेमुदत उपोषण मागण्यांची पूर्तता होत नाही, तोपर्यंत सुरु ठेवले जाणार आहे. या उपोषणात सोमवारी पहिल्या दिवसी दोन कर्मचार्यांनी सहभाग नोंदवला तर उर्वरित कर्मचार्यांनी पाठींबा दर्शवला. मंगळवारी प्रत्यक्ष उपोषणात दर दिवशी दोन याप्रमाणे कर्मचारी सहभाग नोंदवणार आहेत. एनएफपीई संघटनेचे औरगाबाद रिजनल सचिव पी.टी. ठोंबरे, रिजनल सचिव ए. ए. गुरचळ, विभागीय सचिव एम. जी. पाटोळे, आरफोरचे विभागीय सचिव आय. पी. शेख आदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपोषणावेळी शाखा सचिव एस. आर. बोपले, सहसचिव बी. एम. वराडे, एम. आर. तायडे, वाय. एम. उपासे, उदय सपकाळे, जी. एस. गिरी, डी. ए. काळमेघ, एस. डी. भट, बी. ए. कोळी, ए. आर. रजाने, वाय. एस. कोल्हे, वाय. ए. तडवी आदी यावेळी उपस्थित होते.