आरएमएस कॉलनीत भाडेकरु तरुणानेच मालकीनीचे घर फोडून लांबविला होता एैवज

0

जळगाव – शहरातील रामानंदनगर परिसरातील आरएमएस कॉलनी येथे ज्योती लिलाधर तायडे वय 46 यांचे घर फोडून चोरट्यांनी दहा हजारांची रोकड तीस हजारांच्या साड्या व दागिने असा ऐवज लांबवल्याची घटनेप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तायडे यांच्या घराशेजारी राहणार्‍या त्यांच्या भाडेखरु तरुणानेच ऐवज लांबविल्याचे समोर आले असून त्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. विजय उर्फ सोनू रामलाल अहिरे असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून 8 हजार 800 रुपयांच्या साड्या, ड्रेस मटेरीयल व गुन्ह्यात वापरलेले लोखंडी हत्यार हस्तगत करण्यात आले आहे.

आरएमएस कॉलनीत ज्योती तायडे विक्रम व निलेश या दोन मुलांसह या वास्तव्यास आहेत. त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. दोन्ही मुले शिक्षण घेत आहे. साड्या विक्रीचे काम करण्यासह हातमजुरीवर त्याचा उदरनिर्वाह भागतो. ज्योती तायडे ह्या त्यांचे आशाबाबा नगर येथील सासरच्यांकडे साफसफाईच्या कामासाठी गेल्या होत्या. यादरम्यान त्यांच्या घरातील डब्यात ठेवलेली दहा हजाराची रोकड तसेच विक्रीसाठी आणलेल्या तीस हजार रुपये किमतीच्या नव्या साड्या व तीन ग्रॅमचे दागिने व दोन भाराचे जोडवे असा ऐवज चोरट्याने लांबविला होता. या घटनेची माहिती मिळाल्यावर रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक रवींद्र पाटील व पोलिस नाईक शिवाजी धुमाळ यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली होती. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच कर्मचार्‍यांनी शेजारील त्याच्या भाडेखरु तरुणानेच चोरी केल्याची शक्यता व्यक्त करुन त्याचीही चौकशी केली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासातही भाडेखरु विजय अहिरे याचे नाव निष्पन्न झाल्यानंतर पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, प्रितम पाटील, राहुल पाटील, नितीन बाविस्कर यांच्या पथकाने त्यास 8800 रुपये किंमतीच्या साड्या व ड्रेस मटेरियल तसेच गुन्ह्यात वापरलेले हत्यारासह ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्यास रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.