डेबूजी युथ ब्रिगेडच्या शिर्डी येथील राज्यस्तरीय परीषदेत भूमिका
निंभोरा- राज्यात धोबी जातीला असलेले एस.सी. प्रवर्गाचे आरक्षण पूर्ववत लागू होण्यासाठी डॉ.भांडे समितीच्या अहवालातील शिफारशी तत्काळ लागू करा व स्वच्छतेचे खरे जनक, थोर प्रबोधनकार संत गाडगेबाबा यांना भारतरत्न पुरस्कार जाहिर करावा या मागण्यांसाठी डेबूजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र तीव्र लढा उभारणार असल्याची भूमिका धोबी समाजाच्या युवकांच्या या संघटनेच्या पहिल्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात जाहीर करण्यात आली. डेबूजी युथ ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकार्यांची राज्यस्तरीय परीषद परीट (धोबी) आरक्षण हक्क परीषदेचे प्रदेशाध्यक्ष व येथील माजी उपसरपंच विवेक ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार,20 सप्टेंबर रोजी शिर्डी येथील सम्राट लॉन येथे उत्साहात झाली. संघटनेचे संस्थापक राहुल वरणकार (अकोला) स्वागताध्यक्ष होते. यावेळी गोपी अण्णा चहकार, उल्हास मोकाळकर, हभप उमेश महाराज आर्य, प्रा.रमेश सांबासकर, सुखदेव शेंद्रे, दीपक सपकाळ, आतीष चाहकर, राजेंद्र देठे, राजाभाऊ शिंदे, अशोक भिलकर, राज्य संघटक राहुल चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मागण्यांसाठी आग्रही राहणार्यांचीच दखल -विवेक ठाकरे
ज्या समाजाचा युवक समाजाच्या मागण्यांसाठी आग्रही राहील त्याचीच दखल राज्यकर्ते घेत आहेत. धोबी समाजाचा गेल्या 60 वर्षापासून प्रलंबित आरक्षण प्रश्नी आगामी काळात शासनाविरुद्ध रस्त्यावरील लढाई लढण्यासाठी सज्ज राहण्याचे व त्यासाठी राज्यभर गावागावांत संघटन उभे करण्याचे आवाहन आपल्या अध्यक्षीय मनोगतात विवेक ठाकरे यांनी केले. युवकांची चळवळ आक्रमक होण्यासाठी समाजाप्रती काहीतरी करून दाखवण्याची आवश्यकता असल्याचे हभप उमेश महाराज आर्य म्हणाले. डेबूजी युथ ब्रिगेड समाजातील वंचित-शोषित यांच्यासाठी सदैव कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट करून समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर विविध स्तरावर लढा उभारण्यात येईल असे संस्थापक राहुल वरणकार यांनी जाहीर केले.
नूतन पदाधिकार्यांच्या नियुक्त्या
प्रास्ताविक उल्हास मोकाळकर यांनी केले. संघटनेच्या वतीने विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष,सोशल मीडिया विभाग आदी नियुक्त्या जाहीर करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. ठाणे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ यांच्या संकल्पनेतून गाडगेबाबा मिशन मुंबई यांनी भेट दिलेली गाडगेबाबा यांच्या जीवनचरित्रावर आधारित 100 पुस्तके पदाधिकारी यांना यावेळी वाटप करून गाडगेबाबा यांच्या साहित्याचा यापुढे जास्तीत जास्त प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले. अरविंद क्षीरसागर,चेतन रोकडे व गिरीष शिरसाळे यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन प्रा.दादासाहेब नन्नवरे यांनी केले. यशस्वितेसाठी संघटनेचे सचिव सत्यप्रकाश आर्य, विशाल रंधे यांच्यासह नगर जिल्हाध्यक्ष सचिन ससाणे, विराज काळे, महेश अभंग, भीमराज बोरुडे, विराज काळे, स्वप्नील बोरुडे, अविनाश बोरुडे व पदाधिकार्यांनी परीश्रम घेतले.