आरक्षण जाहीर होताच उमेदवारांची नावे स्वयंघोषित

0

शहापूर । काही दिवसांपूर्वी इतर तालुक्यांप्रमाणे शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद 14 आणि पंचायत समितीच्या 28 जागांचे आरक्षण जाहीर झाले. त्यानंतर लगेचच सोशल मीडियावर स्वयंघोषित उमेदवारांची नावे चर्चेत आली आहेत. यापूर्वी फेब्रुवारी 2012 मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या होत्या. ऑगस्ट 2014 ला ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर जानेवारी 2015 ला झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पुरेसा संख्याबळ नसल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्या गठीत होऊ शकल्या नाहीत. त्यानंतर अधिनियमात सुधारणा करण्यात आल्यानंतर आता आरक्षण जाहीर होताच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.

विश्रामगृहात झाली सर्वपक्षीय बैठक
शहापूर तालुक्यात महायुतीबाबत विश्रामगृहात शुक्रवारी बैठक झाली. या वेळी मनसेचे तालुका अध्यक्ष जयवंत मांजे, बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष योगेश हजारे, संघर्ष सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिचंद्र पाटील, भारिपचे तालुका अध्यक्ष संजय भालेराव, रासपचे तालुका अध्यक्ष अरविंद निपूर्ते हे यावेळी महायुतीच्या चर्चेसाठी उपस्थित होते.

राजकीय हालचालींना वेग
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सत्तेसाठी राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा व इतर पक्षात चांगलीच चुरस होणार आहे. त्यातच सर्वच पक्षांमध्ये प्रवेश करणार्‍यांची संख्या ऐन निवडणुकीच्या काळात जास्त दिसून येत आहे. त्यातच काँग्रेस, मनसे, बविआ, आगरी सेना, कुणबी सेना, आरपीआय, माकप, भाकप, भारिप, रासप व इतर संघटनांचा पाठिंबा विजयासाठी फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी बैठकांच्या माध्यमातून व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.