अहमदाबाद : काँग्रेसने पटेल आरक्षणाची प्रमुख मागणी मान्य केली आहे. विधानसभेत गैरआरक्षित समुदायासाठी विधेयक सादर केले जाईल. काँग्रेसने आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून, ते सत्ता मिळाल्यानंतर त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे आपण काँग्रेससोबत असल्याचे पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल याने जाहीर केले. भाजपने जवळपासच्या कार्यकर्त्यांना 50 लाख रूपये देण्याचे आमिष दाखवले. पैसे देऊन आमचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही हार्दिकने केला.
आरक्षणाची मर्यादा पार करणे शक्य
यासंदर्भात हार्दिक म्हणाला, भाजपने पाटीदार समाजावर नेहमीच अन्याय केला आहे. पण पाटीदार समाजासाठी लढण्याचा आमचा हक्क आहे. अनेक राज्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा 49 टक्क्यांहून अधिक करण्यावर न्यायालयाचा प्रतिबंध आहे. अशाप्रसंगी कोणताही अडथळा येऊ नये म्हणून काँग्रेस सत्तेवर आल्यास विधेयक आणण्यात येईल. आरक्षणाची 49 टक्क्यांची मर्यादा पार करणे शक्य आहे. अनेक राज्यांमध्ये असे झाले आहे. काँग्रेसने पटेल समाजाला ओबीसीच्या धर्तीवर आरक्षण देण्यास सहमती दर्शवल्याचा दावाही हार्दिक पटेल यांनी केला.
तिकिटावरून मतभेद नाहीत
काँग्रेस सरकार समिती बनवून मंडल आयोगाच्या शिफारशींच्या आधारावर सर्व्हे केला जाईल आणि गैरआरक्षित मागासवर्गीय लोकांना आरक्षणाचा लाभ दिला जाईल. काँग्रेस आणि मी स्वत: समझोत्याचा मसुदा तयार केला आहे. आम्ही काँग्रेसला तिकीट मागितलेले नाही. तिकिटावरून कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही काँग्रेसला मत देण्याचे अपील करणार नाही. पण ते लोकांसाठी काम करत आहेत. त्यामुळे निर्णय आम्ही जनतेवर सोडला आहे. भाजपने मला तर काँग्रेसचा हस्तकही म्हटले. पण पाटीदार समाजासाठी मी लढणारच, असा विश्वास हार्दिकने व्यक्त केला.