आरटीईचे प्रवेश होणार अकरावीप्रमाणे!

0

पुणे । शिक्षण हक्क कायद्यातील 25 टक्के आरक्षित प्रवेश यंदा अधिक सक्षमपणे अकरावीच्या प्रवेश पध्दतीप्रमाणे चालविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. अनाथ बालके, विधवा, घटस्फोटीतांच्या मुलांच्या प्रवेशातील समस्या सोडविण्यासाठी नियमात बदल केले आहेत.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत देण्यात येणार्‍या प्रवेशाबाबत आता पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरुकता झाली असून मागील वर्षी जागांच्या तुलनेत जवळपास तिप्पट चौपट अर्ज शिक्षण विभागाकडे जमा झाले होते. तसेच, राज्यभरातही या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. एक लाख जागांसाठी जवळपास तितकेच अर्ज राज्यभरातून आले होते. तसेच, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत गतवर्षी प्रवेश प्रक्रिया बर्‍यापैकी सुरळीत झाली होती. मात्र, त्यात काही त्रुटी असल्याचे पालकांचे म्हणणे होते. त्यानुसार यंदाच्या वर्षी याबाबत बैठका घेऊन या त्रुटी दूर करण्याचे काम सध्या सुरू आहे.

याबाबत माहिती देताना राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक शरद गोसावी म्हणाले, आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जवळपास पूर्ण झाले असून जानेवारी महिन्यापासून हे प्रवेश सुरू करण्यात येतील. दरम्यान, मागील वर्षी पेक्षा यावर्षी प्रतिसाद जास्त येण्याची शक्यता पाहाता तसेच एकूणातच प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही ही प्रक्रिया अकरावी प्रमाणे राबविण्याचा निर्णय घेत आहोत.