सहसंचालक दिनकर टेमकर यांची माहिती
पुणे : राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असणार्या 25 टक्के जागांवर आरटीई अंतर्गत प्रवेश मिळण्यासाठी राबविण्यात येणार्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली असून, आता पालकांना पाल्यांच्या प्रवेशासाठी 30 मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांनी शुक्रवारी दिली. यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने, तसेच अनेक पालक अद्यापही प्रवेश प्रक्रियेपासून दूर असल्याने मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे यंदा आरटीई प्रवेशासाठी चुरस होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन लाखांहून अधिक अर्ज प्राप्त
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव असणार्या 25 टक्के जागांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत राज्यभरातून दोन लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात दोन लाख 13 हजारांपेक्षा अधिक अर्ज संगणकीय ऑनलाइन प्रणालीद्वारे आणि मोबाइल अॅपद्वारे केवळ 713 पेक्षा अधिक अर्ज भरण्यात आले. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. राज्यभरात आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी 5 मार्चपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली. प्रवेशासाठी एकूण 9 हजार 194 शाळांमध्ये एक लाख 16 हजार 782 जागा उपलब्ध आहेत. पालकांनी दाखल केलेले अर्ज आणि कागदपत्रांची छाननी अधिकार्यांमार्फत केली जाणार आहे. छाननीत पात्र ठरलेल्या अर्जांची 30 मार्चनंतर प्रवेशासाठी सोडत काढण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर सोडतीत निवड झालेल्या मुलांना संबंधित शाळेमध्ये प्रवेश घ्यावा लागणार आहे.