‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी सुरू

0

पिंपरी-चिंचवड : आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत प्रवेश प्रक्रियेच्या दुसर्‍या फेरीला (दि. 30) रोजी सुरुवात झाली आहे. पालकांना 5 एप्रिलपर्यंत दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांचे प्रवेश घ्यायचे आहेत; मात्र, प्रवेशाबरोबर इतर अ‍ॅक्टिव्हिटीजसाठी पैशांची मागणी केली जात आहे. मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत 25 टक्के गरीब विद्यार्थ्यांसाठी प्रवेश राखीव असतानाही शहरातील खासगी विनाअनुदानित शाळांकडून पालकांची अडवणूक केली जात आहे. पैशांअभावी अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले असून, त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे पालकवर्गाकडून पैशांची मागणी करणार्‍या शाळांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शाळांमध्ये माहिती फलक दिसेना
बर्‍याच शाळांमध्ये शासनाने दिलेल्या सूचनेनुसार ‘आरटीई’ प्रवेशासंदर्भातील माहिती फलक शाळेच्या दर्शनी भागात लावण्याची सूचना देऊनही, माहिती फलक लावण्यात आलेला नाही. फलकावर प्रवेशासाठी आवश्यक असणारी माहिती, कागदपत्रे, सूचना यांचा समावेश नाही. प्रवेशाबाबतची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी भित्तीपत्रके, बॅनर लावण्यात यावेत, त्यावर प्रवेशाची कागदपत्रे, प्रवेशाचे वेळापत्रक, मदत केंद्रांची नावे यांची माहिती द्यावी, अशा सूचनांचे शाळांकडून पालन होताना दिसत नाही.

माहितीसाठी पालकांची फिराफिर
शाळांमध्ये मदत केंद्र नसल्यामुळे पालकांना प्रवेशाबाबत योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. शिक्षकवर्ग मुख्याध्यापकांना भेटू देत नाहीत. खासगी शाळा असल्यामुळे संस्था चालकांना भेटा, असे सांगितले जाते. ‘आरटीई’ची प्रवेश प्रक्रिया दहावी-बारावीच्या परीक्षेच्या वेळी सुरू असल्यामुळे पुरेसा कर्मचारी वर्ग नसतो. त्यामुळे पालकांना एका प्रवेशासाठी शंभर चौकशा कराव्या लागतात. त्यामुळे शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रियेसंदर्भात ठोस भूमिका घेण्याची मागणी पालकवर्गाकडून होत आहे.