आरटीई 25 टक्के जागांची 8 एप्रिलला सोडत

0


संगणीकृत लॉटरीपध्दतीने प्रवेशाची सोडत

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) वंचित घटकातील मुला-मुलींसाठी मोफत प्रवेशाच्या 25 टक्के जागांची प्रवेशाची सोडत सोमवारी 8 एप्रिल रोजी आझम कॅम्पस येथील ऊर्दु मुलांची शाळा येथे सकाळी साडेअकरा वाजता काढण्यात येणार आहे. याबाबतचे परिपत्रक प्राथमिक शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी गुरुवारी काढले. राज्यातील आरटीई प्रवेशाच्या 9 हजार 195 शाळांमध्ये 1 लाख 16 हजार 895 जागा उपलब्ध आहेत. यासाठी राज्यभरातून 2 लाख 46 हजार 28 अर्ज दाखल झाले आहेत. आरटीईची प्रवेश प्रक्रिया 5 मार्चपासून सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची मुदत 30 मार्च रोजी संपली. त्यानंतर शाळेमध्ये प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या जागा व आलेले प्रवेश अर्ज यांची छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

एक लाख जागांसाठी दुप्पटीहून अधिक अर्ज

आरटीई प्रवेशाच्या एक लाख जागांसाठी दुप्पटीहून अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे संगणीकृत लॉटरीपध्दतीने प्रवेशाची सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर पालकांना प्रवेश घेण्यासाठी काही मुदत दिली जाईल. त्यानंतर रिक्त झालेल्या जागांसाठी प्रवेशाची दुसरी सोडत काढली जाणार आहे. पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक 54 हजार 139 तर सर्वांत कमी नंदुरबारमधून 573 अर्ज दाखल झाले आहेत. यंदा पहिल्यांदाच अर्ज भरण्यासाठी मोबाइल अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, मोबाइल अ‍ॅपद्वारे केवळ 943 अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली.