जळगाव : नवीन वाहन नोंदणीसाठी दुचाकीमालकाकडून कर म्हणून वसूल केलेली रक्कम सरकारी तिजोरीत न भरता त्यावर रोखपालाने डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला असून काशिनाथ धनसिंग पावरा (50, रा.उमर्टी, ता.चोपडा) यांनी रामानंद नगर पोलिसांकडे तक्रार केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काशिनाथ पावरा यांनी 28 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशातील ढालवाडी येथून नवीन दुचाकी घेतली. नोंदणी करण्याकरीता 30 नोव्हेंबर रोजी आरटीओ कार्यालयात रोखपाल विभागात खिडकी क्र.31 वर रोखपाल नागेश पाटील यांच्याकडे 7 हजार 142 रुपयांचा भरणा केला. त्याबदल्यात पाटील यांनी दोन प्रतित पावत्या (एमएच 19आर 19120002216) दिल्या. दुचाकीची नोंदणी उशिरा केली म्हणून दंड आकारण्यात आला.
या दंडाची रक्कम पावरा यांनी 24 डिसेंबर रोजी भरुन क्रमांक घेण्यासाठी अर्ज केला. दोन महिन्यानंतरही वाहन क्रमांक मिळाल्याचा मोबाईलवर मेसेज न आल्याने पावरा यांनी सोमवारी आरटीओ कार्यालयात येवून चौकशी केली असता 7 हजार 142 रुपयांची ऑनलाईन नोंदणी दिसते, मात्र पावती परस्पर रद्द करण्यात आलेली दिसली. रद्द केलेल्या पावतीचे पैसे नागेश पाटील यांनी सरकारी तिजोरीतही भरले नाहीत व पावरा यांनाही परत केले नसल्याचे समोर आले.या प्रकरणी पावरा यांनी आरटीओ तसेच पोलिसात तक्रार केली आहे.