‘आरटीओ’ला खोट्या केसमध्ये अडकविण्याची तर कर्मचार्‍यांना जीवे मारण्याची धमकी

0

हॉटस् गृपवर कार्यालयातील लिपिकानेच टाकला धमकीचा संदेश

जळगाव :- शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दोन एजंटामध्ये हाणामारीची घटना ताजी असतांना, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील लिपिक नागेश पाटील याने कार्यालयीन कामकाजासाठी असलेल्या व्हॉटस्गृपवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांना खोट्या गुन्ह्यात तर वसुली अधिकारी इंगळे यांच्यासह सर्वाना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकाराने खळबळ उडाली असून कालच्या मारहाणीप्रकरणी पोलिसात तक्रार दिल्याचा याप्रकरणाचा संबंध असून त्यातून नागेश पाटील याने हा संदेश टाकल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान या प्रकारानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही, सहा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे तसेच वसुली अधिकारी चंद्रशेखर इंगळे यांनी तक्रारीसाठी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले होते.

काय आहेत व्हॉटस्ऍप ग्रृपवर मॅसेज
कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता यावी, सुचनांचे आदान-प्रदान करता यावे यासाठी जळगाव आरटिओ नावाने व्हॉटस्ऍपग्रृप तयार करण्यात आला आहे. यावर वरीष्ठ अधिकार्‍यांसह कार्यालयीन शिपाया पर्यंत सर्वच कर्मचारी आहे. या गृपवर 23 रात्री 11.40 वाजता नागेश गंगाधर पाटील या आरटीओ कार्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत कर्मचार्‍याने आरटीओ शाम लोही यांच्या नावाने धमकी देणारा भलामोठा व्हॉटसऍप मेसेज टाकला. यात सहाय्यक आरटीओ किरण मोरे यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेल, तर करवसुली अधिकारी सी.एस.इंगळे यांच्यासह इतरांना जिवेठार ठार मारण्याची धमकी दिली.

आरटीओंच्या फिर्यादीवरुन गुन्ह्याची नोंद
याप्रकरणी सुरुवातीला लोही यांच्यासह तीनही अधिकार्‍यांनी रामानंदनगर पोलिस ठाणे गाठले. याठिकाणी पोलीस निरिक्षक अकबर पटेल यांच्याशी चर्चा केली. यानंतर शाम लोही याच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात नागेश पाटील विरोधात भादवि कलम 500, 506 नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या संदेशाव्दारे धमकीच्या या प्रकाराने मंगळवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली. दिवसभर याच प्रकरणाच्या चर्चांना ऊत आला होता.