पुणे । प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नागरिकांना देण्यात येणार्या विविध प्रकारच्या सेवा-सुविधा ऑनलाइन करण्यात आल्यामुळे कामे करून घेण्यासाठी अनेकांना दलालांची मदत घ्यावी लागते. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड पडतो. ही बाब लक्षात घेऊन पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आरटीओशी संबंधित ऑनलाइन कामे करण्यासाठी जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात विशेष नागरी सेवा केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. इंटरनेटची सुविधा नसणार्या, त्याचे ज्ञान नसणार्यांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.
केंद्रीय परिवहन विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार आरटीओच्या माध्यमातून देण्यात येणार्या वाहनांबाबतच्या तब्बल 41 प्रकारच्या सेवा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. या सेवा सर्वसामान्य नागरिकांसह वाहतूकदारांशी संबंधित आहेत. संबंधित सेवांसाठी अर्ज करण्यासाठी चाचणीची वेळ घेणे आणि अगदी शुल्क भरणा करण्यासाठीही ऑनलाइन यंत्रणेद्वारे जावे लागते. 41 सेवांसह काही काळांत आणखी विविध सेवा ऑनलाइन करण्यात येणार आहे.
नागरिकांची आर्थिक फसवणूक
ऑनलाइन यंत्रणेद्वारे आरटीओतील सुविधा घेण्यासाठी इंटरनेटची व्यवस्था असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे संबंधितांना त्याचे ज्ञानही आवश्यक आहे. मात्र, ही सुविधा नसणार्या नागरिकांना ऑनलाइन प्रक्रिया करताना मोठ्या अडचणी येतात. त्यामुळे अनेक नागरिकांना नाईलाजास्तव दलालांची मदत घ्यावी लागते. त्यात नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असते. यावर पर्याय म्हणून आरटीओकडून प्रत्येक तालुक्यात विशेष नागरी सुविधा केंद्र सुरू होणार आहे. याबाबतचा प्रस्तावही जिल्हा प्रशासनाकडून आरटीओच्या वतीने पाठविण्यात आला आहे.
प्रस्तावावर सकारात्मक निर्णय
रिवहन विभागाची ऑनलाइन यंत्रणा अत्यंत सोपी आहे. मात्र, अनेक नागरिकांना त्या यंत्रणेचा वापर करता येत नाही. या नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक तालुक्यात विशेष नागरी सुविधा केंद्र सुरू करावे, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला दिला आहे. येत्या काही दिवसांतच या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होईल. संबंधित केंद्र चालकांना आरटीओतील कामांबाबतचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
– बाबासाहेब आजरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी