जळगाव। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) जयंत पाटील यांना त्यांच्या दालनात येऊन एका मोटार ड्रायव्हींग स्कूलच्या मद्यपी मालकाने दमदाटी करत शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी 16 रोजी घडली. या प्रकारानंतर शनिवारपासून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयात दलालांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे सकाळपासून कार्यालयात येणार्यांची तपासणी करुनच त्यांना आत प्रवेश दिला जात आहे. यापूर्वी देखील दलालांना आरटीओ कार्यालयात प्रवेश बंदी करण्यात आली होती. मात्र त्यानंतर ते पुन्हा आत आले मात्र यापुढे दलालांना कार्यालयात येऊ देणार नसल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी सांगितले आहे. अनधिकृत दलालांमुळे कार्यालयातील रहदारीचा प्रश्न निर्माण झाला होता. वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता वाढली असून कार्यालयाला दलाल मुक्त करावयाचे असल्याने दलालांना कार्यालयात येण्यास मज्जाव करण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
कामकाजावर परिणाम
मोटार वाहनासंबंधी कागदपत्र, वाहन परवाने तसेच परिवहन संबंधी सर्वकामकाज उपप्रादेशिक कार्यालयात चालते. दलाल हे नागरिकांना वेळेत काम करुन देत असल्याने नागरिकांची त्यांना अधिक पसंती दिसून येते. आता सर्व कागदपत्राचे कामकाज ऑनलाईन झाले असले तरी दलालांकडून फॉर्म भरुन पुढील प्रक्रिया केली जाते. शनिवार पासून दलालांना कार्यालयात बंदी घातल्याने त्याचा परिणाम कार्यालयातील कामकाजांवर दिसून आला. तरी देखील नागरिक दलालांकडून अर्ज भरुन पुढील कामे करीत होते. मात्र कार्यालयाच्या रोजच्या महसूलवर परिणाम झाला असल्याचे दिसून आले.
उच्च न्यायालयाचे आदेश बघणार
यापूर्वी देखील अनधिकृत दलालांची आरटीओ कार्यालयातुन हकालपट्टी करण्यात आलेली आहे. त्यावेळी 186 दलालांनी हायकोर्टात याचिका दाखल करुन दाद मागितली होती. त्यावेळी दलालांना आरटीओ कार्यालयात कामकाज करु देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. जळगाव जिल्हा मालक चालक संघटनेच्या प्रतिनिधींकडून याबाबत अधिकार्यांना सांगण्यात येत आहे. दलालांकडून हायकोर्टाची प्रत मागितली असून आदेशाबाबत शहानिशा करुन पुढील निर्णय घेणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
मनपाने अतिक्रमण काढले
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात दलालांमुळे व किरकोळ विक्रेत्यांमुळे अतिक्रमण वाढल्याने कार्यालयातर्फे महानगर पालिका आयुक्तांना अतिक्रमण हटविण्यासंबंधी पत्र पाठविण्यात आले होते. यांची दखल घेत मनपातर्फे अतिक्रम काढण्यात आले. कार्यालयाच्या वॉल कंपाऊटला लागुन असलेल्या शासकीय जागेवर अतिक्रमण करुन दलालांनी दुकाने थाटली होती. त्यामुळे मोठी अडचण होत होती. अतिक्रमण पथकाने कार्यालयाबाहेर असलेल्या टपर्या जप्त केल्या आहेत.
वाद घालणार्यांवर कारवाई न करता चालक मालक संघटनेच्या प्रतिनिधींना वेठीस धरले जात आहे. 250 प्रतिनिंधी आरटीओ कार्यालयात काम करुन उदनिर्वाह करतात. त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याने त्यांचा उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहेत. उच्च न्यायालयाने फेबु्रवारी 2016 मध्ये परवानगी दिली असतांना आम्हाला येथून हकलुन देण्यात आले आहे. कामकाज करु दिले नाही तर पुन्हा हायकोर्टात जावू
सुरेश पाटील, मालक चालक संघटना सचिव
दलालांमुळे कार्यालय परिसरातील अतिक्रमासोबतच अस्वच्छता देखील वाढली आहे. हाय कोर्टाचे आदेश असल्याचे संघटनेच्या प्रतिनिंधीकडून सांगण्यात येत आहे मात्र त्यांच्या कडून आदेशाची प्रत मागितली असून प्रत वाचन करुन पुढील निर्णय घेतला जाईल
जयंत पाटील,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी