परिपत्रक काय काढता, कायदा असल्याची करून दिली अधिकार्यांना आठवण
जळगाव: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतुक केली जाते…. शाळांच्या व्हॅनमध्येही पोरं दाबुन भरली जातात…. एस.टी. बसेसच्या मुदत संपल्या आहेत… ओव्हरलोड ट्रक भरधाव जातात…. दुचाकीस्वार हेल्मेट घालत नाही…. हे सारे डोळ्याने दिसत असतांना वाहतुक विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाकडुन कुठल्याही प्रकारच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने खुद्द जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी या दोन्ही विभागाचे अक्षरश: धिंडवडे काढले. तसेच हेल्मेट सक्तीबाबत सर्कुलर काय काढता? कायदाच असल्याची आठवणही त्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांना करून दिली.
खासदारांच्या अध्यक्षतेखाली नव्याने स्थापन झालेल्या रस्ताशक्ती समितीची बैठक आज नियोजन भवनात पार पडली. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी खा. रक्षा खडसे, खा. उन्मेष पाटील, आ. शिरीष चौधरी, आ. लता सोनवणे उपस्थित होते. नव्याने स्थापन झालेल्या या समितीच्या कामकाजाबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी माहिती दिली. या बैठकीला सदस्य असलेल्यांचीही त्यांनी माहिती दिली. मात्र समितीची पहिलीच बैठक असल्याने कुठल्याही प्रकारची माहिती संबंधित विभागाच्या अधिकार्यांकडे नव्हती. त्यामुळे खा. रक्षा खडसे, खा. उन्मेष पाटील यांनी पुढील बैठकीच्या आधी महिनाभरात जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा, कर्मचार्यांची संख्या, अपघातांची संख्या, ब्लॅक स्पॉटबाबतची परिपूर्ण माहिती सादर करण्यास सांगितले.
हेल्मेट सक्तीवरून जिल्हाधिकार्यांनी धरले धारेवर
हेल्मेट सक्ती असतांनाही त्याचे कुठेही पालन होत नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले. त्यावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी शासकीय कार्यालयात हेल्मेट सक्तीबाबत सर्कुलर काढण्यात आल्याचे सांगितले. त्यावर जिल्हाधिकार्यांनी नाराजी व्यक्त करीत सर्कुलर काय काढता? कायदाच असल्याची आठवण लोही यांना करून दिली. ओव्हरलोड असलेल्या ट्रकवर देखिल कुठलीही कारवाई वाहतुक शाखेकडुन होत नाही. हेल्मेट सक्तीची तातडीने अंमलबजावणी करा असे सांगत आधी शासकीय कार्यालयापासून सुरवात करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी वाहतुक शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभागाला दिले.
अपघातस्थळांची नव्याने यादी करा
जिल्ह्यात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होतात. वारंवार एकाच ठिकाणी होणार्या अपघातांसाठी अपघात स्थळांचे नव्याने सर्वेक्षण करून त्याची यादी सादर करण्याचे आदेश खा. रक्षा खडसे, खा. उन्मेष पाटील यांनी प्रशासनाला दिले.
मद्यपी दुचाकीधारकांवर कारवाई आवश्यक
मद्यपान करून दुचाकी चालविणार्यांमध्ये युवकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतुक विभागाने दुचाकीस्वारांची तपासणी करणे आवश्यक असल्याचे खा. रक्षा खडसे यांनी सांगितले. तसेच कारवाई करतांना कुणाचीही तमा बाळगू नका, अगदी लोकप्रतिनीधी असतील तरी त्यांच्यावरही कारवाई करा अशा सुचनाही त्यांनी दिल्या.