पुणे । आरपीआय पक्षाने भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवूनही गटनेते पदावर सुनीता परशुराम वाडेकर यांची निवड केल्याचे बुधवारी जाहीर केले आहे. मुळात महापालिकेत पक्षच नसताना त्यांनी स्वतंत्र दालनाचा ताबा घेतल्याचे चित्र बघायला मिळाले.
फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत आरपीआय आठवले गटाच्या उमेदवारांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली. त्यातील पाच उमेदवारांच्या नशिबात विजयाची माळ पडली. त्यामुळे मानाने आरपीआयचे आणि नियमाने भाजपचे पाच नगरसेवक महापालिकेत आले. त्यातील नवनाथ कांबळे यांना ठरल्याप्रमाणे उपमहापौर आणि डॉ. धेंडे यांना स्थायी समिती सदस्यत्व आणि गटनेतेपद देण्यात आले. धेंडे यांचेही गटनेता पद फक्त दाखवण्यापुरते होते. त्यांनाही गटनेत्यांच्या बैठकीला बोलावले जात नव्हते. दुर्दैवाने कांबळे यांचे निधन झाल्यावर धेंडे यांना उपमहापौर पदाची जबाबदारी संभाळावी लागली आणि वाडेकर यांची गटनेतेपदी वर्णी लागली. मात्र त्यांना कोणतेही अधिकृत पत्र महापौर किंवा विभागीय आयुक्तांनी दिलेले नाही. मात्र शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी मात्र महापौर लवकरच असे पत्र देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे अधिकृत एकही सभासद नसताना आरपीआयचे गटनेतेपद विचार करायला लावणारे आहे.