भुसावळ । रेल्वेच्या मालमत्तेचे संरक्षण आणि सुरक्षा प्रदान करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाची स्थापना करण्यात आली. रेल्वे संपत्ती अधिनियमाद्वारे आरपीएफला गुन्हेगारांची चौकशी आणि फिर्याद नोंदविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यानंतर प्रवासी तसेच त्यांच्याशी निगडीत क्षेत्रात संरक्षण आणि सुरक्षेचा अतिरीक्त प्रभार देण्यात आला. विशेष म्हणजे 1985 मध्ये आरपीएफला इतर सशस्त्र दलांप्रमाणे सशस्त्र दलाचा दर्जा प्रदान करण्यात आला. तेव्हापासून आजतागायत आरपीएफ दलाने रेल्वे संपत्तीचे रक्षण आणि प्रवाशांची सुरक्षिततेबाबत केलेले कार्य हे कौतुकास्पद असून आरपीएफमुळेच रेल्वेला सुरक्षा कवच लाभले असल्याचे प्रतिपादन डीआरएम आर.के. यादव यांनी केले. रेल्वे सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त आरपीएफ बॅरेक मैदानावर आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी एडीआरएम अरुणकुमार धार्मिक, सिनीयर डीएससी सुनील मिश्रा, विभागीय सुरक्षा आयुक्त अजय दुबे, सिनीयर डीई एन.के. अग्रवाल, आरपीएफ निरीक्षक व्ही.के. लांजीवार, गोकुळ सोनोनी, सी.एस. पटेल तसेच विभागातील अधिकार्यांची उपस्थिती होती.
रेल्वेची चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करण्यात यश
डीआरएम आर.के.यादव म्हणाले की, रेल्वेची मालमत्ता चोरीच्या अनेक घटना होत असतात मात्र भुसावळ मंडळ रेल्वे सुरक्षा दलाने नेहमीच सतर्क राहून तत्परतेने 10 लाख 40 हजार 660 रुपयांची चोरीस गेलेली संपत्ती पुनर्प्राप्त केली. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही 60 टक्के अधिक असल्याचे डीआरएम यादव यांनी सांगत रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्याचे कौतुकही केले.
गुन्हेगार जेरबंद
रेल्वे सुरक्षा आयुक्त दुबे यांनी आपल्या मनोगतात वर्षभरात आरपीएफ दलाने केलेल्या कामगिरीचा आढावा सादर केला. ते म्हणाले की, प्रवाशांना सुरक्षा प्रदान करण्यासह रेल्वे परीसराला उपद्रवींपासून मुक्त ठेवण्याच्या दृष्टीने 23 हजार 743 गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर खटला चालविण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ही गुन्ह्यांच्या तपासाचे प्रमाण 25.96 टक्के अधिक आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला आरक्षित डब्यात अनधिकृतरित्या प्रवास करणार्या 7 हजार 436 पुरुष प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून महिलांचा प्रवास सुरक्षित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत.
68 दल सदस्यांचा गौरव
आरपीएफ बॅरेकवर झालेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणार्या 68 बल सदस्यांचा गौरव करण्यात आला. रेल्वे सुरक्षा दलातर्फे रेल्वे संपत्ती आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असेच कार्य निरंतर सुरु राहिल, असेही सुरक्षा आयुक्त दुबे यांनी मनोगतात सांगितले. याप्रसंगी आरपीएफ जवानांनी कवायती सादर केल्या.