जगन सोनवणे 26 रोजी काढणार भुसावळ-जळगाव पायी मोर्चा ; 10 ठिकाणी रेल रोको
भुसावळ- पालिकेच्या अखत्यारीतील आरपीडीरोडचे रेल्वेकडे हस्तांतरण टाळावे, रेल्वेच्या हद्दीतील पाच हजार झोपडपट्टी तोडून 20 हजार नागरीक विस्थापीत झाल्याने नुकसानीचे पंचनामे करून प्रत्येक कुटुंबास पाच लाख रुपये भरपाई देण्यासह सातबारा उतारा द्यावा या प्रमुख तीन मागण्यांसाठी कामगार नेते तथा माजी नगरसेवक जगन सोनवणे यांनी सोमवारपासून प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर शेकडो नागरीकांच्या उपस्थितीत ईशारा आंदोलन छेडले होते मात्र त्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्यानंतर बुधवार, 26 जानेवारीपासून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषण आंदोलनाला अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे.
26 रोजी दहा ठिकाणी रेल रोको
आमरण उपोषणाचीही दखल घेतली न गेल्यास 26 जानेवारी रोजी तिरंगा ध्वज घेवून भुसावळ-जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर लाँग मार्च तसेच याच दिवशी जिल्हाभरात दहा ठिकाणी रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा सोनवणे यांनी दिला आहे. आंदोलनात अशोक पारधे, मौलाना अब्दुल, नईम पिंजारी, राजा प्रजापती, सोमकुमार कनोजिया, दिलीप जोनवाल, शेख निसार, सुनील कापसे, कैलास वारूळकर, रत्ना सुरवाडे, संगीता ब्राह्मणे, किरण पवार यांच्यासह अनेक नागरीक, महिला सहभागी झाल्या आहेत.