आरबीआयची मोठी घोषणा: गोल्ड लोनच्या व्हॅल्यूत वाढ

0

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेने आज आपले वार्षिक पतधोरण जाहीर केले. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज गुरुवारी ६ रोजी सकाळी पत्रकार परिषदे घेऊन याची घोषणा केली. आरबीआयने रेपो रेट आणि रिझर्व्ह रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. जैसे थेच ठेवले आहे. सध्या रेपो रेट ४ टक्के आणि रिझर्व्ह रेपो रेट ३.३ टक्के आहे. दरम्यान आरबीआयने गोल्ड लोनवरील रकमेची मर्यादा वाढवल्याने सामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोन्यावरील कर्जाची व्हॅल्यू वाढवण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. आता सोन्यावर ९० टक्क्यांपर्यंत कर्ज मिळणार आहे, जे अगोदर ७५ टक्केपर्यंत मिळत होते. करोना व्हायरस संकट काळात अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. या काळात पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी अनेकांन गोल्ड लोनचा पर्याय उपलब्ध आहे.

सर्व साधारण लोक आणि छोटे व्यापारी सोन्यावर आता अधिक कर्ज घेऊ शकतील. गुरुवारी ऑगस्ट व सप्टेंबरसाठीचे पतधोरण रिझर्व्ह बँके (Reserve Bank of India)कडून जाहीर करण्यात आले. बँकेने व्याज दरात कोणताही बदल केला नसला तरी या वर्षात लॉकडाउनचा विचार करता दोन वेळा व्याज दरात १.१५ टक्के इतकी कपात केली होती.

व्याज दराबाबत घोषणा केल्यानंतर दास यांनी देशात आर्थिक सुधारणा सुरू झाल्याचे सांगितले. विदेशी चलन साठा वेगाने वाढत असल्याचे ते म्हणाले. करोना व्हायरसमुळे जगभरातील अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. जानेवारी ते जून या काळात अर्थव्यवस्थेची स्थिती प्रचंड खराब होती, असे दास म्हणाले. आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत म्हणजे जुलै ते सप्टेंबर या काळात महागाई दर वाढण्याची शक्यता आहे. पण ऑक्टोबर महिन्यात त्याच घट होऊ शकते. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये जीडीपी ग्रोथ नेगेटिव्ह होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

३१ ऑगस्टला लोन मोरेटोरियमचा कालावधी संपणार आहे. त्यामुळे गव्हर्नर यांच्याकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र त्याबाबत कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.